यावर्षीचे ‘बिग बॉस’चे पाचवे पर्व अधिक चर्चेत राहिले आहे. या वर्षी ‘बिग बॉस’च्या विजेतेपदावर सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने नाव कोरलं आहे. विजेतेपद जिंकल्यानंतर सूरजचे विविध स्तरातून कौतुक करण्यात आले. त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफरदेखील मिळाल्या. तसेच त्याचा मोठा चाहतावर्गदेखील तयार झाला. त्याचवेळी मराठी चित्रपट, मालिका दिग्दर्शक व ‘कलर्स मराठी’ वाहिनीचे सर्वेसर्वा केदार शिंदे यांनी केलेल्या एका घोषणेने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. केदार यांनी केलेल्या घोषणेमुळे सर्वच स्तरात त्यांचे कौतुक होताना बघायला मिळाले तसेच अनेक जण खूप भावुक झालेलेदेखील बघायला मिळाले. (bigg boss fame suraj chavhan movie)
‘बिग बॉस’मध्ये सूरजला जेव्हा पाहिले तेव्हा अनेकांनी विरोध दर्शवला. त्याला नीट खेळता येत नाही असेही बोलले गेले. मात्र दिवस जसे पुढे गेले तसा त्याचा खेळ सुधारत गेला. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने पाठिंबा दिला. विजेतेपद पटकावल्यानंतर केदार यांनी सूरजबरोबर चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती. या चित्रपटांचे नाव ‘झापुक झुपुक’ असे चित्रपटाचे नाव असल्याची घोषणादेखील करण्यात आली होती. त्यामुळे हा चित्रपट कधी येणार? ही उत्सुकता सूरजच्या चाहत्यांना लागली होती.
अशातच आता या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला आहे. याबद्दलची पोस्ट अभिनेत्री दीपाली पानसरेने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. दीपालीने मुहुर्ताचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सूरज चव्हाण, केदार शिंदे, पुष्कराज चिरपुटकर, पायल जाधव असे कलाकार दिसून येत आहेत. तसेच दीपालीने ‘झापुक झुपूक’ व ‘मुहूर्त’ लिहिलेली क्लॅपदेखील शेअर केली आहे.
दीपालीने फोटो शेअर करत लिहिले की, “मॅनिफेस्ट मॅजिक, एक सुंदर असा क्षण. खूप दिवसांपासून केदार शिंदे यांच्याबरोबर काम करण्याची वाट बघत होतो. आता संधी मिळाली.खूप खूप धन्यवाद केदार शिंदे व बेला शिंदे. ‘झापुक झुपूक’ टीमला खूप साऱ्या शुभेच्छा”. दरम्यान दीपालीच्या या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता सूरजचे चाहते त्याच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.