दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला ऐन दिवाळीच्या मोक्यावर मोठा धक्का बसला आहे. दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेते मल्लमपल्ली चंद्र मोहन यांचं निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. विनोदी भूमिकांमुळे चंद्र मोहन यांना चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळी ओळख मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून हृदयविकारांच्या आजारामुळे ते त्रस्त होते. आज सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी चंद्र मोहन यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे.
हैद्राबाद येथील जुबली हिल्स या खासगी रुग्णालयामध्ये चंद्र मोहन यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांनी रुग्णालयामध्येच अखेरचा श्वास घेतला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये चंद्र मोहन यांचं नाव मोठं होतं. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९६६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘‘रंगुला रत्नम‘ चित्रपटामधून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. त्याचबरोबरीने तमिळनाडूमधील सर्वोत्कृष्ट पुरस्कारही त्यांना मिळाला होता. तसेच कलाक्षेत्रातील अनेक नावाजलेल्या पुरस्कारांनी चंद्र मोहन यांना सन्मानित करण्यात आलं.
सोमवारी (१३ नोव्हेंबर) चंद्र मोहन यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. चंद्र मोहन यांच्या निधनानंतर कलाकार मंडळी हळहळ व्यक्त करत आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.