‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घरघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहणं तिला आवडतं. तिने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोच. अशातच आता प्राजक्ताने शेअर केलेल्या एका व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी प्राजक्ता नुकतीच बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात दिसली. (Prajakta Mali In Amitabh Bachchan Kon Banega Crorepati)
‘कौन बनेगा करोडपती’चा सध्या १५ वा सीजन सुरू आहे आणि या कार्यक्रमात अनेक स्पर्धक आपलं नशीब आजमावण्यासाठी सहभागी होतात. अशातच अजय नावाचा एक स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी झाला होता. हा स्पर्धक प्राजक्ताचा खूप मोठा चाहता असल्याचे त्याने बिग बींना सांगितले. तेव्हा अमिताभ यांनी प्राजक्ताला थेट व्हिडीओ कॉल केला आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या हिंदी कार्यक्रमात मराठमोळी प्राजक्ता दिसली.
आणखी वाचा – “पंखा साफ करायची वेळ…”, नेटकऱ्याच्या कमेंटवर सिद्धार्थ चांदेकरने दिलं तोडीस तोड उत्तर, म्हणाला, “कधी…”
यावेळी प्राजक्ताने अजयबरोबर संवाद साधला. तेव्हा अजयने प्राजक्ताला “प्राजक्तप्रभा, प्राजक्तराज-साज व योगा हे सगळं एकाचवेळी कसं सांभाळता?” असं विचारलं. यावर प्राजक्तानेही योगामुळे हे सगळं सहजशक्य होत असल्याचे म्हटले. पुढे तिने अजयला त्याच्या पुढील खेळासाठी शुभेच्छा देत त्याला भेटणार असल्याचेदेखील सांगितले. त्याचबरोबर प्राजक्ताने अमिताभ यांच्यासोबतही संवाद साधला. बिग बी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बघतात याविषयी त्यांचे आभारदेखील मानले. हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने “काय सांगू किती भारी वाटलं” असं म्हणत आनंद व्यक्त केला आहे. या व्हिडीओखाली ती असं म्हणाली आहे की, “कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी होईन असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणूनच मी चाहत्यांना माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग मानते आणि हे अजय व सोनी टीव्ही यांच्यामुळे खरं असल्याचे सिद्धदेखील झाले आहे.” यापुढे तिने सोनी टीव्ही व अमित फाळके यांनी केलेल्या सहकाऱ्याबद्दल व मार्गदर्शनासाठी त्यांचेदेखील आभार मानले. प्राजक्ताने तिला लाभलेल्या या संधीसाठी तिच्यापेक्षाही जास्त आनंद झालेल्या व्यक्तींनादेखील मनापासून धन्यवाद म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान प्राजक्ता ही उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्तम कवियत्री, एक उत्तम नृत्यांगणा आणि एक यशस्वी उद्योजिकादेखील आहे. सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असणाऱ्या प्राजक्ताचा काही दिवसांपूर्वीच ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला. यानंतर आता ती चाहत्यांसाठी नवीन काय घेऊन येणार? यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.