Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला अटक, ‘पुष्पा २’मुळे प्रकरण अंगलट, पण असं नक्की काय घडलं? : तेलगू चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन बाबत मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्याला ४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी संध्या थिएटर व्यवस्थापन, अभिनेता आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अधिका-यांनी सांगितले होते की, चित्रपटाची टीम प्रीमियरसाठी येणार असल्याची कोणतीही पूर्व सूचना पोलिसांना नव्हती, अशी तक्रार पोलिसांकडून करण्यात आली.
या महिन्याच्या सुरुवातीला, हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान घडलेल्या दुःखद घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांच्यासमवेत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अभिनेता अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमल्याने गोंधळ उडाला. त्यानंतर झालेल्या गोंधळात थिएटरचे मुख्य गेट कोसळले, परिणामी चेंगराचेंगरी झाली. एका ३५ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आणि तिचा ९ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला.
याच प्रकरणी अल्लू अर्जुनला ताब्यात घेतलं असल्याचं पाहायला मिळत आहे. CNN व News18 नुसार, अल्लू अर्जुनविरुद्ध हैदराबाद चेंगराचेंगरीप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याशिवाय, संध्या थिएटरवर फौजदारी निष्काळजीपणासाठी कलम 105 आणि 118(1) BNS सह गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्लू अर्जुननेही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत शोकाकुल कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या होत्या.
“संध्या थिएटरमधील दुःखद घटनेने खूप दुःख झाले. या अकल्पनीय कठीण काळात शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. मी त्यांना खात्री देऊ इच्छितो की ते या दुःखात एकटे नाहीत आणि कुटुंबाला वैयक्तिकरित्या भेटतील. त्यांच्या दुःखासाठी जागेच्या गरजेचा आदर करताना, मी त्यांना या आव्हानात्मक प्रवासात नेव्हिगेट करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे”, असं अभिनेता म्हणाला. यावेळी त्याने कुटुंबाला २५ लाख रुपयांची भेटही दिली. ‘पुष्पा २’ चित्रपटाला जगभरात भरघोस प्रतिसाद मिळत असताना अल्लू अर्जुनला अटक झाल्याची बातमी धक्का देणारी आहे.