सध्या अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. डिसेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात ५ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. ‘पुष्पा २’ या चित्रपटाने ‘जवान’, ‘पठाण’, ‘डंकी’ या चित्रपटांचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. कमी कालावधीमध्ये या चित्रपटाने १००० कोटीरुपयांपेक्षादेखील अधिक कमाई केली आहे. ‘पुष्पा २’च्या चर्चा सुरु असतानाच आता या चित्रपटाचा आता तिसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी तिसऱ्या भागामध्ये नक्की काय घडू शकतं? याबद्दलची माहिती थोडक्यात समोर आली होती. अशातच आता तिसऱ्या भागाबद्दलची नवीन अपडेट समोर आली आहे. (pushpa 3 tagline)
‘पुष्पा २’ या चित्रपटाचे यश साजरे करण्यात आले. ही पार्टी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी अभिनेता अल्लू अर्जुनने ‘पुष्पा ३’ येणार असण्यावर शिक्कामोर्तब केले. तसेच तिसऱ्या भागाची टॅगलाइन काय असणार याचा खुलासादेखील अल्लू अर्जुनने केला आहे. ‘पुष्पा’च्या दोन्ही भागामध्ये अल्लू अर्जुन व रश्मिका मंदना मुख्य भूमिकेत दिसून आले होते. तसेच सुपरस्टार फाहाद फाजीलदेखील खलनायकाच्या भूमिकेत दिसून आला होता.
या चित्रपटांचे दिग्दर्शक सुकुमार यांचेदेखील मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. आता अल्लू अर्जुनने ‘पुष्पा ३’चे टॅग लाइनदेखील सांगितली. जेव्हा ‘पुष्पा १’ आला तेव्हा त्याची टॅग लाइन ‘झुकेगा नही साला’ ही टॅगलाइन होती. तसेच ‘पुष्पा २’ चित्रपट आला तेव्हा ‘हरगीज झुकेगा नही साला’ अशी टॅगलाइन होती. त्यामुळे आता तिसऱ्या भागाची टॅगलाइन काय असणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
आशातच आता अल्लू अर्जुनने तिसऱ्या भागाच्या टॅगलाइनची हिंट देत ‘अब रुकेगा नही साला’ असेल असे सांगितले आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या एका स्टेटमेंटमुळे तिसरा भाग येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच अल्लू अर्जुनने ‘पुष्पा २’ च्या रेकॉर्ड ब्रेक कमाईवर देखील भाष्य केले आहे. अभिनेत्याने यशाचे श्रेय चाहत्यांना दिले आहे. तो म्हणाला की, “नंबर स्थिर नाही आहेत. पण माझ्यासाठी प्रेम अधिक महत्त्वाचे आहे. रेकॉर्ड हे मोडण्यासाठी असतात असे मी नेहमी म्हणतो. कदाचित येत्या दोन-तीन महिन्यांपर्यंत मी या रेकॉर्डचा आनंद घेणार आहे. पण उन्हाळा येईपर्यंत मला वाटतं की पुढील चित्रपटांचे रेकॉर्डही मोडतील”. दरम्यान आता तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.