Reshma Shinde Family : ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. रेश्माच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. रेश्माने पवनसह लग्नगाठ बांधली. २९ नोव्हेंबर रोजी अभिनेत्री विवाहबंधनात अडकली. रेश्माचे जवळचे कुटुंबिय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या खास उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. पहिलं केळवण, घरगुती मेहंदीसोहळा, हळदी समारंभ, होणाऱ्या नवऱ्याची ओळख असा प्रवास करत रेश्मा विवाहबंधनात अडकली. रेश्माने दोन पद्धतीने लग्न केलं. मराठमोळ्या व साऊथ स्टाईलने अभिनेत्री लग्नबंधनात अडकली. सासरी पार पडलेल्या गृहप्रवेशाची खास झलकही रेश्माने तिच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केली.
या व्हिडीओमध्ये रेश्माचे सासरी पारंपरिक पद्धतीने स्वागत झाल्याचे पाहायला मिळालं. रेश्माच्या स्वागतासाठी खास विविध फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. तसंच यावेळी तिचे औक्षणही करण्यात आले. माप ओलांडत रेश्माने सासरच्या घरात प्रवेश केला. यावेळी सासरच्या घरची काही खास माणसं तिच्या स्वागतासाठी उपस्थित होती. हार, फुलं आणि आकर्षक अशा रोषणाईने रेश्माच्या सासरचे घर सजल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. अशातच आता रेश्माने सासरच्या मंडळींबद्दल व गृह्प्रवेशाबद्दल ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
रेश्मा म्हणाली, “मी माझं लग्न खूप एन्जॉय केलं. दोन-तीन दिवस मी खूप धमाल केली. जवळचे नातेवाईक मित्र परिवार व कुटुंबियांच्या उपस्थितीत मी लग्न केलं. अगदी थोडक्यात मला लग्न करायचं आणि तसंच मी केलं. लग्नानंतर सासरी गेल्यावर सासरच्या मंडळींनी अत्यंत गोड पद्धतीने माझं स्वागत केलं. अगदी पारंपरिक पद्धतीने माझा गृहप्रवेश करण्यात आला. सूनेचं कौतुक करण्यात ते कुठेही कमी पडले नाहीत. पहिल्याच दिवशी त्यांनी मला स्वतःच्या हाताने जेवण खाऊ घातलं. छान असं केळीच्या पानात पंचपक्वान्न माझ्या समोर ठेवण्यात आले. अगदी साग्रसंगीत स्वागत झालं. खूप मज्जा आली. माझ्यासाठी हे सरप्राइज होतं असं म्हणायला हरकत नाही”.
पुढे सासरच्या मंडळींबाबत बोलताना ती असंही म्हणाली की, “माझ्या सासरची मंडळी माझी मालिका पाहत नाहीत. कारण भाषा वेगळी आहे. त्यांना तरीपण थोडंफार मराठी येतं. पण मला आता कन्नड शिकायचं आहे. आणि हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. पण मी कन्नड शिकणार आहे. सुरवातीला मी आणि पवन मित्र होतो. बरीच वर्ष आम्ही एकमेकांशी संपर्कात होतो. ते बरीच वर्षे युकेला राहत होते. गेल्यावर्षी अम्मा (सासूबाई) गेल्या. अम्मा गेल्यानंतर मग वाटलं की आता लग्न करुया. असं म्हणून आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला”.