कलाकार मंडळी सध्या नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करण्यामध्ये व्यग्र आहेत. काही मंडळी कुटुंबियांबरोबर नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी जंगी सेलिब्रेशन करत आहेत. तर काही कलाकार थेट परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही तिचा पती कुणालसह परदेश दौरा करत आहे. गेले काही दिवस सोनाली सोशल मीडियावर परदेशातील काही फोटो शेअर करत आहे. सध्या ती बालीमध्ये एण्जॉय करत आहे. यादरम्यानचे तिचे काही फोटो आता चर्चेत आले आहेत. मात्र यादरम्यान सोनालीला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. (Sonalee Kulkarni Troll)
सोनालीने काळ्या व लाल रंगाच्या वेस्टर्न स्टाइन ड्रेसमधील सुंदर फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले. या फोटोंमध्ये तिचा मोहक लूक पाहायला मिळाला. विशेष म्हणजे चाहत्यांनाही सोनालीच्या निमित्ताने बाली दर्शन घडलं. ती बालीमध्ये एण्जॉय करत असताना नेटकऱ्यांना एक गोष्ट खटकली. ती म्हणजे सोनालीचे एकटीचे फोटो. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पती कुणाल कुठेही दिसला नाही. याचवरुन सोनालीच्या फोटोंवर कमेंट करण्यात आली. यावर सोनालीने अगदी तिच्या स्टाइलमध्ये सडेतोड उत्तर दिलं आहे.
सोनालीच्या या फोटोवर एका महिलेने विचित्र कमेंट केली. ही कमेंट वाचून तिचा राग अनावर झाला. “वहिनीसाहेब बंटी पाटील साहेबांचं काय झालं ओ…त्यांना तुम्ही सोडलं का?. त्यांचे पैसे कमी झाले का?, त्यांना किती लुबडणार?”. अशी कमेंट एका महिलेने केली. यावर सोनाली उत्तर देत म्हणाली, “हे आश्चर्यचकित करणारं आहे. तुमच्यासारखे लोक खासकरुन बायकाच बायकांना वाटेल ते बोलतात. तेही शुन्य माहिती असताना काहीही बोलतात. मुळात बायका स्वतःच्या जीवावर, स्वतः कष्ट करुन पैसे कमावू शकतात यावर आधी तुमच्यासारख्या बायकांनीच विश्वास ठेवायला हवा”.

दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं की, “बिचारा नवरा त्याचा एकही फोटो नाही”. या कमेंटवरही सोनालीने उत्तर दिलं. ती म्हणाली, “त्याची मर्जी. तुम्हाला त्याचा एवढा त्रास का होतो?”. योग्य ती उत्तरं देत सोनालीने ट्रोलर्सची बोलतीच बंद केली आहे. त्याचबरोबर काहींनी सोनालीच्या लूकचं कौतुक केलं. तसेच तिच्या ड्रेसिंग स्टाइलचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.