Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate : गायक मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी ‘आमचं ठरलं’ म्हणत लग्नगाठ बांधली. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. अत्यंत साध्या व पारंपरिक अंदाजात दोघांचा लग्नसोहळा उरकला. चाहत्यांनाही त्यांच्या या साधेपणाचे कौतुक केले. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला कलाक्षेत्रातील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. कोकणातील चिपळूण येथे त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला.
मुग्धा-प्रथमेश सध्या लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करत आहेत. लग्नानंतर मुग्धा सोशल मीडियावरुन त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण शेअर करत आहे. नुकताच मुग्धाने लग्नानंतरचा तिचा पहिला उत्सव साजरा केला. दत्तजयंती निमित्त मुग्धाने तिच्या सासरी भजनसेवा केली. यावेळी मुग्धा व प्रथमेश दोघांनीही एकत्र भजन गात दत्तजयंती उत्सव साजरा केला. दत्तजयंतीचा व्हिडीओ मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. यानंतर मुग्धाने शेअर केलेल्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मुग्धाने तिच्या सासरी गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मुग्धा व प्रथमेश फुलांच्या पायघड्यावरून चालत येताना दिसत आहेत. या व्हिडीओत दोघांनी घेतलेल्या उखाण्यांनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रथमेशने घेतलेला मजेशीर उखाणा लक्षवेधी होता. “कपात ओतला चहा चहाखाली ठेवली बशी, मुग्धा माझी गरीब गाय, बाकी सगळ्या मारक्या म्हशी” असा गमतीशीर उखाणा त्याने घेतला. तर मुग्धाने “मंगळसूत्राच्या दोन वाट्या, म्हणजे माहेरची व सासरची खून, प्रथमेशच नाव घेऊन कलाश्रीमध्ये गृहप्रवेश करते, नीना आणि उमेश लघाटे यांची सून” हा उखाणा घेत लघाटेंच्या घरी गृहप्रवेश केला.
मुग्धा-प्रथमेशचे लक्षवेधी उखाणे पाहता, अभिनेत्री सुकन्या मोने यांनी कमेंट करत, “दोघांनीही एकदम भारी उखाणा घेतला आहे” अशी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. तर चाहत्यांनी “मुग्धाने उखाणा घेतल्यावर लगेच सासुबईंकडे पाहिले बहुतेक. त्यांनीही आनंदाने मान डोलावली”, “मारक्या म्हशी…जबरदस्त आवडलं दादा”, “वा छान उखाणे घेतले दोघांनी” अशा कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.