RCB Lifts Second WPL Trophy : वुमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा रोमांचक असा अंतिम सामना बडोद्याच्या कोटांबी स्टेडियममध्ये पार पडला. आणि त्यामध्ये रॉयल चैलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. कॅप्टन स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली आरसीबीने दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकत इतिहास रचला. २०२४ साली आरसीबीने स्पर्धा जिंकली होती आणि आता पुन्हा एकदा वुमन्स प्रीमियर लीगच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर त्यांचं नाव कोरलं गेलं. या विजयासह आरसीबीच्या टीमचा, सर्वाधिक विजेतेपद जिंकणाऱ्या संघांच्या यादीत मुंबई इंडियन्ससह समावेश झाला. तर यंदा जेमिमाने ‘दिल्ली कॅपिटल्स’च्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे स्मृती-जेमी या जिवलग मैत्रिणी आमनेसामने असताना अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता आरसीबीने दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकल्यावर या टीमवर संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान प्रसिद्ध मराठी गायक सलील कुलकर्णी यांनी स्मृती आणि जेमिमा यांच्या मैत्रीबद्दल एक खास पोस्ट देखील शेअर केली.
दरम्यान ही पोस्ट शेअर करत सलील कुलकर्णी यांनी लिहिलं की, “स्मृती आणि जेमिमा. मैत्री, खेळ, आधार दोघींनी भारताकडून वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला होता. आत्ता त्या WPL च्या फायनल मध्ये एकमेकींविरुद्ध जीव तोडून लढल्या. स्मृतीच्या आयुष्यात वादळ आलं तेव्हा जेमिमा ऑस्ट्रेलियाची लीग सोडून मैत्रीणीसाठी सांगलीत तिच्याबरोबर थांबली होती. आता स्मृती बाद झाल्यावर कदाचित DC जिंकू शकते या आशेने जेमिमा आनंदून नाचली. स्मृती आयुष्यातल्या सगळ्या वादळातून बाहेर येऊन या स्पर्धेत सर्वात जास्त धावा केल्या आणि RCB ने कप जिंकला. त्या दोघी पुन्हा मैत्रिणी म्हणून जवळ आल्या. म्हणजे चांगली माणसं अजून आहेत. एकमेकांशी स्पर्धा करून सुद्धा मैत्री जपणारी.” (RCB Lifts Second WPL Trophy)
तर सलील कुलकर्णी यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान आरसीबी संघाची कर्णधार स्मृती मानधना हिने अंतिम सामन्यात ८७ धावा केल्या. गेल्या काही महिन्यांपासून स्मृती वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत होती. या कठीण काळात स्मृतीची मैत्रीण जेमिमा रॉड्रिग्जने तिला खंबीरपणे साथ दिली. (RCB Lifts Second WPL Trophy)




