हिंदी मनोरंजन सृष्टीतून नुकटीकह एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले असून वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास यांच्या कुटुंबियांकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची बातमी जाहीर करण्यात आली आहे. पंकज उधास यांच्या मुलीने वडिलांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली आहे. नायब उधास हिने सोशल मीडियावर “जड अंत:करणाने मी तुम्हा सर्वांना ही दुःखद बातमी सांगत आहे की, पद्मश्री पंकज उधास आता आपल्यात नाहीत. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला” असं म्हणत त्यांच्या निधनाची बातमी जाहीर केली आहे. पंकज उधास यांच्या निधानाचे वृत्त येताच ज्येष्ठ मराठी गायक सुरेश वाडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुरेश वाडकर यांनी एबीपीला प्रतिक्रिया देत असं म्हटलं की, “फारच वाईट झालं. मला मोठा धक्का बसला आहे. चांगल्या माणसाचं आज निधन झालं. त्यांना कर्करोग होता हे आम्हा कोणालाच ठाऊक नव्हतं. त्यांच्याशी माझं रोज भेटणं नव्हतं. पण माझी व त्यांची अगदी जवळची मैत्री होती. एवढ्या मोठ्या गायकाचं अचानक निधन होणं ही खूपच वाईट गोष्ट आहे. संपूर्ण जगाला त्यांनी त्यांच्या गझलने आनंद दिला. आज ते आपल्यामध्ये नाही असं म्हणावं लागत आहे”.
आणखी वाचा – गझल पोरकी झाली! ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन, वयाच्या ७२व्या वर्षी जगाचा निरोप
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मी मुंबईमध्ये नाही. त्यांच्या कुटुंबियांबद्दल विचार करुन माझ्या अंगावर काटा येत आहे. त्यांची बायको, दोन्ही मुली डोळ्यासमोर आल्या. त्यांची मुलगी नायाब तर खूपच प्रेमळ आहे. त्यांचा ‘खजाना’ कार्यक्रमही पुन्हा होणार होता. माझ्या शाळेमध्येच त्याची रिहर्सल सुरु होती. अधून-मधून आमची भेटही होत असे. पण त्यांच्या निधनाची बातमी कळताच मोठा धक्का बसला”.
दरम्यान, पंकज उधास यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच मराठीसह हिंदी क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोनू निगम, मनोज मुंताशीर, अनुप जलोटा यांसह नरेंद्र मोदी, नितीन गडकरी व योगी आदित्यनाथ यांनीही त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मराठीतील प्रियंका बर्वे, राहुल देशपांडे यांसह अनेकांनी पंकज उधास यांना श्रद्धांजली वाहिली आहे.