सध्याच्या या डिजिटल युगात सोशल मीडियाचे स्तोम अधिकच माजले आहे. या सोशल मीडियाचे जितक्या सकारात्मक गोष्टी आहेत. तितक्याच नकारात्मक गोष्टीही आहेत आणि यातील महत्त्वाचा प्रकार म्हणजे ट्रोलिंग. सोशल मीडियावर ट्रोलिंगसारख्या घटना अत्यंत सामान्य झाल्या आहेत. अनेकांना या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कलाकारांनाही या ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. या ट्रोलिंगसारख्या प्रकारांवर अनेक कलाकार दुर्लक्ष करतात तर काही कलाकार या ट्रॉलर्सना त्यांच्या अंदाजात उत्तर देतात. अशातच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री व गायिका केतकी माटेगांवकरला जिम करतानाच्या व्हिडीओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. (Ketaki Mategaonkar On Instagram)
यावेळी केतकीने तिच्या सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत ट्रोलर्सना सदफेतोड उत्तर दिले होते. शरीर ही देवाने दिलेली देणगी असून त्याचा अभिमान बाळगा. तुम्ही सुंदर, अद्वितीय आहात. तुमच्यातील एखाद्या विशिष्टतेला महत्त्व द्या, जर एखादा डॉक्टर, पोषणतज्ञ, मित्र, पालक किंवा ज्यांना तुमची मनापासून काळजी आहे, ते तुम्हाला सांगतात, त्यांचे ऐका. सोशल मीडियावर अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत कमेंट करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या शरीराच्या काही ठराविक अवयवांवर अश्लील कमेंट करणं याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत” असं म्हणत तिने एक खास पोस्ट शेअर केली होती.

अशातच अभिनेत्री हेमांगी कवी हिलादेखील नुकताच या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. हेमांगीच्या एका व्हिडीओवर नेटकऱ्याने अश्लील कमेंट केली होती. यानंतर या कमेंटला इन्स्टाग्राम स्टोरीवर मेन्शन करत हेमांगीने त्याचा चांगलाच समाचार घेतला. “ही अशी जनावर वृत्तीची माणसं समाजात हिंडताना माणसाची कातडी घालून समाजात वावरतात. पण ती जनावरचं असतात. चित्रपट किंवा नाटक हे काल्पनिक असतात. पण आपल्या आजूबाजूला अशी खरीखुरी माणसं आहेत. हे वार करतात आणि पकडलेही जात नाहीत. हे कुठल्याही चित्रपट किंवा नाटकापेक्षा घातक असून ही माझ्यासाठी एक प्रकारची हिंसाच आहे.” असं म्हणत तिने संताप व्यक्त केला होता.
दरम्यान, तिच्या या पोस्टला केतकीने पाठिंबा दिला आहे. केतकीने हेमांगीच्या पोस्टचा स्क्रीनशॉट काढून स्वत:च्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मेन्शन केलं आणि त्यावर “खरं आहे हेमांगी ताई” असं म्हणत “माझं शरीर, माझा अभिमान” असा हॅशटॅगही दिला आहे. त्यामुळे हेमांगीच्या या पोस्टवर केतकीने तिचे समर्थन दिलं असून सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबतही भाष्य केलं आहे.