काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड हिने आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली. कार्तिकीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरुन शेअर करताच साऱ्यांना खूप आनंद झाला. कार्तिकी व रोनित पिसे हे आई-बाबा होणार आहेत. नुकताच कार्तिकीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम अगदी थाटामाटात पार पडला. कार्तिकीच्या अचानक समोर आलेल्या डोहाळ जेवणाच्या फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. (Kartiki Gaikwad)
कार्तिकीच्या डोहाळ जेवणात राजेशाही थाटमाट पाहायला मिळाला. अगदी जवळचे नातेवाईक, कुटुंबियांच्या उपस्थितीत हा शाही सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्तिकी व रोनित यांचा पारंपरिक अंदाज खास लक्षवेधी ठरला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रोनित बायकोची काळजी घेतानाही दिसला. कार्तिकीने आजवर तिच्या गायनाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सोशल मीडियावरही कार्तिकी बऱ्यापैकी सक्रिय असते. अशातच कार्तिकीच्या डोहाळ जेवणादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
‘समर्था खेसे’ या युट्यूब चॅनलवर कार्तिकीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिकी तिच्या आई होण्याबद्दलचा आनंद थोडक्यात व्यक्त करताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर कार्तिकी या व्हिडीओमध्ये मुलगा होणार की मुलगी याबद्दलही बोलताना दिसत आहे. “मुलगा हवा की मुलगी?”, असा प्रश्न कार्तिकीला विचारला असता, यावर उत्तर देत गायिका म्हणाली की, “खरंतर मी असा काहीच विचार केला नाही आहे, मुलगा हवा की मुलगी. जे कुणी होईल मुलगा किंवा मुलगी त्या बाळाचं आरोग्य उत्तम असुदे. त्या बाळाकडून घरातल्यांची, मोठ्यांची, देशाची, धर्माची सगळ्यांची सेवा होवो. बाळ सुसंस्कृत होवो. आमच्यापरीने आम्ही त्याला किंवा तिला खूप चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करु”.
पुढे ती असंही म्हणाली की, “मुलगा होणार की मुलगी यापेक्षा ते जर गाण्याच्या क्षेत्रात आलं तर मला जास्त आनंद होईल. मुलगा, मुलगीपेक्षा जे कोणी येईल त्यांनी जी गाण्याची परंपरा आहे ती कायम ठेवावी अशी माझी इच्छा आहे. पण हे मी लादणार नाही. जी काही आवड असेल त्यावर ठरवू”.