सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांनी आजवर आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. शिंदे कुटुंबातील गायकांनी गायलेली गाणी कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी आहेत. शिंदे कुटुंबीयांवर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबातील एका तरुण व्यक्तीचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. गायक व अभिनेता उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली. या पोस्टद्वारे आपल्या कुटुंबातील व्यक्तीचं निधन झालं असल्याचं त्याने सांगितलं. तसेच त्याने दुःख व्यक्त केलं.
प्रल्हाद शिंदे यांच्यानंतर शिंदे कुटुंबीय गायकीचा वारसा पुढे नेत आहेत. आनंद शिंदे, मिलिंद शिंदे आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे हा वारसा जोपासत आहेत. अशामध्येच आता या कुटुंबाबत एक वाईट घटना घडली आहे. प्रल्हाद शिंदे यांचा नातू व आनंद शिंदे यांचा पुतण्या सार्थक शिंदेचं निधन झालं आहे. उत्कर्षने सार्थकचा फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली.
सार्थक हा दिनकर शिंदे यांचा मुलगा. ३१ जुलै (मंगळवार) सार्थकने अखेरचा श्वास घेतला. तबला व ढोलवादक म्हणून सार्थक लोकप्रिय होता. उत्कर्षने सार्थकलाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणाला, “तुझ्यासारखा कलाकार होणे नाही. आम्हाला तुझी कायम आठवण येत राहिल”. उत्कर्षने शेअर केलेल्या फोटोमध्ये सार्थकचा हसरा चेहरा दिसत आहे.

सार्थक भीम गीतांच्या कार्यक्रमासाठी लोकप्रिय होता. त्याच्या आवाजातील भीमगीतं ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर असायचे. सार्थकच्या निधनानंतर शिंदे कुटुंबीयांसह त्याच्या चाहत्यांनाही दुःखद धक्का बसला आहे. हृदय विकाराच्या झटक्याने सार्थकचं निधन झालं असल्याचं बोललं जात आहे.