मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. सध्या सिद्धार्थ मराठी चित्रपटांबरोबरच काही हिंदी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये देखील व्यस्त आहे. चित्रपटांच्या शूटिंगसाठी सतत धावपळ करणारा सिद्धार्थ जाधव कधी विमान, तर कधी गाड्या अशा वेगवेगळ्या मार्गांनी सतत प्रवास करत आहे. अशातच सिद्धार्थला नुकताच त्याच्या विमान प्रवासादरम्यान एक वाईट अनुभव आला. सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. जो सध्या प्रचंड चर्चेत आहे. हा व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थने एका विमान कंपनीवर आपला राग व्यक्त केला होता.
कामानिमित्ताने मुंबई ते गोवा विमान प्रवास करताना सिद्धार्थला अतिशय वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रवासादरम्यान त्याची बॅग अक्षरश: पूर्णपणे तुटली असल्याचे पाहायला मिळाले. याचाच एक व्हिडीओ शेअर करत त्याने “नमस्कार मी सिद्धार्थ जाधव. आज मी इंडिगोच्या फ्लाईटमधून मुंबई ते गोवा प्रवास करत होतो. तुम्हीच बघा त्यांनी माझ्या सामानाची कशी काळजी घेतली आहे. हँडल विथ केअर म्हणताना त्यांनी अक्षरशः बॅगेचा फक्त हँडल नीट ठेवला आहे. बाकी सामानाची त्यांनी ज्या प्रकारे काळजी घेतली आहे, ते तुम्ही बघू शकता.” असं म्हटलं होतं. या व्हिडीओमध्ये त्याच्या बॅगेची पूर्णत: दुर्दशा झाली असल्याचे पाहायला मिळाले.

आणखी वाचा – ओटीटीवरील अश्लील कंटेटविरोधात कठोर कारवाई, सरकारकडून ‘या’ साईट्स अन् ॲप्सवर बंदी, जाणून घ्या…
सिद्धार्थच्या या व्हिडीओची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. अनेक माध्यमांमध्ये त्याच्याबद्दल बातम्याही झाल्या. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आता इंडिगो कंपनीकडून दखल घेण्यात आली आहे. इंडिगो कंपनीकडून अभिनेत्याबाबत झालेल्या कृतीबद्दल दिलगिरी व्यक्त केली गेली आहे. तसेच या कंपनीकडून सिद्धार्थला त्याच्या नुकसान झालेल्या बॅगऐवजी नवीन बॅगही देण्यात आली आहे. याचाही एक व्हिडीओ सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओमध्ये त्याने “इंडिगो कंपनी तुम्ही दिलेल्या जलद प्रतिसादाबद्दल धन्यवाद” असं म्हणत इंडिगो कंपनीचे व कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांचे आभारही मानले आहेत.
दरम्यान, सिद्धार्थने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील सिद्धार्थने चांगला लौकिक मिळवला आहे. तसेच सिद्धार्थ सध्या चर्चेत आहे ते म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरीवल लोकप्रिय कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमातील त्याच्या निवेदकाच्या भूमिकेसाठी. त्यासह सिद्धार्थची प्रमुख भूमिका असलेला लग्नकल्लोळ हा चित्रपटदेखील नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे.