मनोरंजनासाठी आता नाटक, मालिका, चित्रपटासह ओटीटीचे अनोखे विश्व तयार झाले आहे. लॉकडाऊननंतरच्या काळात आता बऱ्याच लोकांचा मनोरंजनासाठीचा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे क्ल अधिकच वाढला आहे. ओटीटीवरील चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अनेक वेळा शिव्या असणारे डायलॉग्स, काही बोल्ड सिन्स यांसारख्या गोष्टी दाखवल्या जातात. ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर वाईट परिणाम होतो, असंही म्हटलं जातं. मात्र आता यावरचाप बसणार आहे. कारण मोदी सरकारनं ओटीटी प्लॅटफॉर्मविरोधात मोठं पाऊल उचललं आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेटबद्दल कारवाई केली आहे. एकूण १८ ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्यात आले आहेत. या ओटीटी प्लॅटफॉर्मशी संबंधित १९ वेबसाइट्स, १० ॲप्स ज्यापैकी ७ गुगल प्लेवरील आहेत आणि ३ ॲपल स्टोअरवरील आहेत. तसंच एकूण ५७ सोशल मीडिया हँडल्स ब्लॉक केले गेले आहेत. ओटीटी माध्यमांवरील अश्लील व आक्षेपार्ह व्हिडीओबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच केंद्राच्या अलीकडील कारवाईचा एक भाग म्हणून, १२ फेसबुक खाती, १७ इन्स्टाग्राम अकाउंट्स, १६ X (पूर्वीचे ट्विटर) आयडी आणि १२ यूट्यूब चॅनल ब्लॉक करण्यात आले आहेत.
Ministry of I&B blocks 18 OTT platforms for obscene and vulgar content after multiple warnings; 19 websites, 10 apps, 57 social media handles of OTT platforms blocked nationwide, says the government. pic.twitter.com/03ojj3YEiF
— ANI (@ANI) March 14, 2024
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, १८ ब्लॉक केलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील कंटेटबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या संदर्भात यापूर्वी अनेकदा इशारे दिले होते. अशातच आता यावर केंद्राने ही कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा २०००च्या तरतुदींनुसार ही कारवाई केली आहे. हे पाऊल उचलण्यापूर्वी, सरकारी मंत्रालये/विभागांनी प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन तज्ञ, महिला हक्कांचे ज्ञान असलेले तज्ञ आणि बाल हक्कांवर काम करणाऱ्यांचा सल्ला घेतला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात आलेल्या ड्रीम्स फिल्म्स, वूवी, येस्मा, अनकट अड्डा, ट्राय फ्लिक्स, एक्स प्राइम, निओन एक्स व्हिआयपी, बेशर्मास, हंटर्स, रॅबिट, एक्स्ट्रामूड, न्यूएफ्लिक्स, मूडएक्स, मोजफ्लिक्स, हॉट शॉट्स व्हिआयपी, फुगी, चिकूफ्लिक्स, प्राइम प्ले आदी ॲप्स व वेबसाइट्सचा समावेश आहे.