Siddharth Jadhav Car News : मराठी सिनेसृष्टीचा एनर्जीटीक स्टार म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारा सिद्धार्थ सोशल मीडियावरही सक्रिय असतो. तो नेहमीच त्याच्या आगामी प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. चाहतेही त्याच्या फोटो व व्हिडीओला भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. अशातच सिद्धार्थ पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. सिद्धार्थने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे तो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. सिद्धार्थने त्याच्या नवीन गाडीनिमित्त हा व्हिडीओ शेअर केला आहे. (Siddharth Jadhav New Car)
अभिनेत्याला भेट म्हणून एक नवीन अलिशान गाडी मिळाली असून या नवीन गाडीचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिद्धार्थला स्टार प्रवाह वाहिनीकडून ही नवीन गाडी मिळाली आहे. स्टार प्रवाहच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमानिमित्त त्याला ही कार मिळाली असून त्याने गाडीचा खास व्हिडीओ शेअर करत त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहे“आज न मागताच खूप काही मिळाले आहे. मराठी टेलिव्हीजनच्या इतिहासातला मी पहिला कलाकार असेन ज्याला बक्षीस म्हणून कार मिळाली आहे. खूप भारी भावना आहेत. खूप मस्त वाटतं आहे” असं म्हणत त्याने त्याच्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “खूप वर्षांपूर्वी “इंडियन आयडॉल” च्या फायनल नंतर अभिजित सावंतला होंडा सिटी मिळाली होती. ते बघून खूप आनंद झाला होता. आणि आज त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या नं १ चॅनेल वर “आता होऊ दे धिंगाणा” सारखा शो होस्ट करायला मिळणं आणि त्याच शो वर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करणं आणि त्याची जी काय पोचपावती म्हणून मला ही गाडी बक्षीस म्हणून मिळणं हे सगळंच स्वप्नवत आहे”.
दरम्यान, या व्हिडीओच्या शेवटी त्याने सर्व टीमचे कौतुक केलं असून त्यांना धन्यवाद म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थची पत्नी नव्या गाडीची पूजा करताना दिसत आहे. तसंच सिद्धार्थच्या लेकी इरा व स्वरा याही गाडी बघून आनंदी झाल्या आहेत. नवीन गाडीनिमित्त त्यांनी केकही कट केला आहे. त्याचंबरोबर त्यांनीदेखील नवीन गाडीची पूजा केली आहे. या नवीन अलिशान गाडीनिमित्त सिद्धार्थच्या अनेक चाहत्यांनी व कलाकारांनी त्याचं कौतुक केलं आहे. त्यांना नवीन गाडीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.