आपल्या कसदार लिखाणाने आणि सशक्त अभिनयाने कायमच चर्चेत राहणारा अभिनेता-लेखक म्हणजे चिन्मय मांडलेकर. चिन्मयने मराठी मालिकांमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले केले. त्यानंतर काही मराठी मालिकांसाठी लिखाणदेखील केले. लेखन व अभिनयात रंगणाऱ्या या अभिनेत्याने मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटामधील बिट्टा कराटे ही त्याची खलनायकाची भूमिका चांगलीच गाजली. याशिवाय शिवराज अष्टकमधील त्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेलादेखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.
लेखन व अभिनय करणाऱ्या या कलाकाराचा प्रवास रंगभूमीपासून सुरु झाला असून या नाटकादरम्यानची एक भयानक घटना त्याने सांगितली आहे.चिन्मयने नुकतीच ‘झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्याबरोबर झालेली एक भयंकर घटना सांगितली आहे. चिन्मयने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबद्दलची एक घटना सांगितली असून यानिमित्ताने त्याने त्याचे कौतुक करत त्याला ‘हॅट्स ऑफ’ असंही म्हटलं आहे.
आणखी वाचा – “अशोक सराफ यांच्यामुळे शिस्त लागली”, श्वेता शिंदेने शेअर केली ‘ती’ आठवण, म्हणाली, “वेळेचं महत्त्व…”
यावेळी चिन्मयने ही आठवण सांगत असं म्हटलं आहे की, “नाटकादरम्यान अनेक गंमतीजमती किंवा किस्से होतंच असतात. पण माझी एक आठवण अशी आहे की, एका चालू नाटकादरम्यान, माझ्या एका सहकलाकाराच्या डोक्याला जखम झाली होती. ती भळभलती जखम घेऊन त्याने ते नाटक पूर्ण केले आणि तो सहकलाकार म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ चांदेकर”.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “आम्ही ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाचे प्रयोग करत होतो. तेव्हा ते नाटक खूप गाजलं होतं. तेव्हा एका प्रयोगामध्ये ब्लॅकआउटदरम्यान, सिद्धार्थला कुठे जायचं हे कळलं नाही आणि तो स्टेजवरुन खाली पडला आणि त्याच्या डोक्याला जखम झाली. त्याच्या डोक्याला लागलेल्या जखमेमधून रक्त वाहत होतं आणि ते रक्त इतकं होतं की, तो कधीही बेशुद्ध पडेल अशी भीती आम्हा सर्वांना वाटत होती. पण त्याने ती भळभळती जखम झालेली असतानाही उरलेलं नाटक पूर्ण केलं आणि प्रेक्षकांची दाद मिळवली. तर या हिंमतीसाठी त्याला माझ्याकडून हॅट्स ऑफ.”