Actor Yogesh Mahajan Passed Away : टेलिव्हिजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी व हिंदी टीव्ही मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणारे अभिनेते योगेश महाजन यांचे निधन झाले आहे. योगेश महाजन यांनी वयाच्या ५० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. दिवंगत अभिनेते योगेश महाजन यांच्यावर आज सोमवार, २० जानेवारी २०२५ रोजी प्रगती हायस्कूल, बोरिवली पश्चिम मुंबई येथे अंतसंस्कार करण्यात आले. अनेक मराठी चित्रपटांशिवाय अनेक हिंदी पौराणिक मालिकांमधून योगेश महाजन यांनी प्रेक्षकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले. ‘शिवशक्ती-तप, त्याग, तांडव’ या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी योगेश उमरगावला होते. या मालिकेत त्यांनी शुक्राचार्याची भूमिका साकारली होती. त्यांच्या आकस्मिक मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका आहे.
योगेश महाजन यांच्या अखेरच्या प्रवासाची माहिती महाजन कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांनी लिहिले की, “आम्हाला अत्यंत दुःखाने कळवावे लागते की आमचे आवडते योगेश महाजन यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्यांचे १९ जानेवारी २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी हा एक भयानक धक्का आहे”. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी संध्याकाळी ‘शिवशक्ती-तप, त्याग, तांडव’चे शूटिंग संपताच योगेश यांची तब्येत बिघडू लागली. त्यामुळे त्याने डॉक्टरांकडे जाऊन औषध घेतले.
त्यानंतर अभिनेते रात्री हॉटेलच्या खोलीत झोपले, मात्र रविवारी सकाळी शूटिंगसाठी सेटवर आले नाही. यानंतर त्यांच्या मालिकेच्या टीममधील अनेक सदस्यांनी त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी काही फोन उचलला नाही. शेवटी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला असता ते बेडवर पडले होते. आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला होता.
जळगाव येथील रहिवासी असलेल्या योगेश यांचा जन्म सप्टेंबर १९७६ मध्ये शेतकरी कुटुंबात झाला. सिनेसृष्टीत कोणीही गॉडफादर नसताना योगेशने आपल्या मेहनतीने मराठी, हिंदी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. मनोरंजन विश्वापूर्वी ते भारतीय लष्करात होते. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात भोजपुरीमधून केली. ‘मुंबईचे शहाणे’, ‘संसाराची माया’ अशा अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे.