सध्या सर्वत्र ‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वाची चर्चा सुरु आहे. साडेतीन महीने चाललेल्या या कार्यक्रमाचा अखेर काल समारोप झाला. अभिनेता करणवीर मेहरा या पर्वाचा विजेता ठरला. करणवीरला ‘बिग बॉस’ची ट्रॉफी व ५० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. करणवीरच्या विजयावर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच काहींनी नाराजीदेखील दर्शवली. विजेता झाल्यानंतर करणवीरची तुलना दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबरोबर केली जात आहे. सिद्धार्थ ‘बिग बॉस’च्या १३ व्या पर्वाचा विजेता होता. त्याला जशी ट्रॉफी मिळाली तशीच ट्रॉफी करणवीरला मिळाली आहे. या सगळ्याबद्दल सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली. तसेच याबद्दल त्याला प्रश्नदेखील विचारण्यात आले. (karanveer mehra on siddharth shukla)
‘बिग बॉस १८’चा विजेता झाल्यानंतर करणवीरने माध्यमांबरोबर संवाद साधला. त्यावेळी त्याला सिद्धार्थबरोबर व त्याच्यासारखीच ट्रॉफी मिळाल्याबद्दल प्रश्न विचारले गेले. त्यावर तो म्हणाला की, “सारखीच ट्रॉफी आहे. तो खूप चांगला होता आणि माझा चांगला मित्रदेखील होता. आम्ही एकत्र जास्त वेळ राहिलो नाही पण एकमेकांना खूप चांगले ओळखायचो. माझी तुलना त्याच्याशी केली जात आहे त्यामुळे मी खुश आहे. तो मनाने खूप चांगला होता आणि माणूस म्हणून पण तो चांगला होता”.
करणवीर पुढे म्हणाला की, “मला आठवतंय की मी जेव्हा मुंबईमध्ये नवीन आलो होतो तेव्हा त्याच्याकडे एक मोठी बाइक होती. माझ्या पोर्टफोलिओसाठी फोटो काढायचे होते त्यासाठी बाइकच्या बाजूला उभं राहून फोटो काढण्याची इच्छा त्याच्यासमोर व्यक्त केली होती. तेव्हा तो खाली आला आणि बाइकची चावी देऊन गेला. इतकी महागडी बाइक जर कोणीही असंच देत असेल तर त्याचं मन किती मोठं होतं याचा अंदाज तुम्ही लावू शकता. मला त्याची आठवण येते आणि आता तो माझ्या या आनंदाच्या क्षणात इथे असता तर अजून आवडलं असतं”.
करणवीर विजेता घोषित झाल्यानंतर शहनाज गिलने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने ट्विटर (X) वर लिहिले की, “तुला यश शोभतं. खूप शुभेच्छा करणवीर”. दरम्यान करणवीरच्या विजयावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच काहींनी त्याच्या विजयावर नाराजीदेखील व्यक्त केली आहे.