गेल्या आठवड्यात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आणि त्याच्या चाहत्यांसह अनेकांच्याच काळजाचा ठोकया चुकला. यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तसंच योगयवेळी त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आणि तो संभाव्य धोक्यातून बाहेरही आला. यानंतर कुटुंबीय व अनेकांच्या जबाबानुसार पोलिसांनी या हल्लेखोराचा तपास करण्यास सुरुवात केली. अशातच ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून सध्या त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत त्याने सैफ अली खानच्या घरावर हल्ला का केला आणि तो आत कसा गेला? याची माहिती समोर आली आहे. (saif ali khan attacked)
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी बांगलादेशी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने चौकशीदरम्यान सांगितले की, तो १२वी पास आहे आणि चांगल्या नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. सूत्रांनी असा दावा केला की, आरोपी सध्या बेरोजगार असून त्याला बांगलादेशात परत जाण्यासाठी त्याला पन्नास हजार रुपयांची गरज होती. त्यामुळे त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला.
तसंच सूत्रांनी पुढे सांगितले की, त्याने सैफ अली खानच्या इमारतीला लक्ष्य केले. कारण त्याच्या लक्षात आले की, सर्व गेट्सवर कोणतीही सुरक्षा नाही आणि आत प्रवेश करणे सोपे आहे. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, “हा गुन्हा केल्यानंतर आरोपी गीतांजली एक्स्प्रेसने कोलकाता आणि तेथून बांगलादेशला पळून जाण्याची योजना आखत होता. मात्र त्याचा प्लॅन अंमलात आणण्यापूर्वीच तो ठाण्यात पकडला गेला.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरच्या लग्नाच्या तयारीसाठी कोकणात पोहोचला डीपी, खास फोटो शेअर करत म्हणाला, “तू बोलवणार आणि…”
दरम्यान घरात घुसलेल्या चोराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आठवडाभर बेडरेस्टचा सल्ला दिल्याचे डॉक्टरांनी तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं. आज पुन्हा एकदा डॉक्टर सैफ अली खानची तपासणी करणार असून, त्यांच्या जखमांची स्थिती पाहून त्यांना डिस्चार्ज देणार की नाही हे ठरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.