९० च्या दशकातील सगळ्या लहान मुलांची आवडती मालिका म्हणजे ‘शक्तीमान’. या मालिकेला लहानांबरोबरच मोठ्यांचेही मनोरंजन केले. १९९७ ते २००५ या कालावधीमध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. नंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करुन आहे. या मालिकेतील महत्त्वाचे पात्र म्हणजे ‘शक्तीमान’ म्हणजे गंगाधरने एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आता जवळपास १८ वर्षांनी ‘शक्तीमान’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पण या मालिकेतील ‘शक्तीमान’च्या भूमिकेसाठी करण्यात आलेल्या निवडीबद्दल आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. (Mukesh Khanna on Ranveer singh)
‘शक्तीमान’ ही गाजलेली मालिका आता चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या चित्रपटातील ‘शक्तीमान’ या महत्त्वाच्या भूमिकेसाठी अभिनेता रणवीर सिंहची निवड करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. यावर आता मुकेश खन्ना यांनी रणवीरच्या निवडीबद्दल विरोध दर्शवला आहे. त्याबद्दल त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर युट्यूबच्या एका व्हिडीओची लिंक शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने रणवीरला खडे बोल सुनावले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र त्यांनी हा व्हिडीओ डिलिट केला आहे.
ते व्हिडीओमध्ये म्हणाले की, “सर्व सोशल मीडियावर रणवीर ‘शक्तीमान’ची भूमिका साकारणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. तेव्हा मी शांत होतो मात्र आता वृत्तवाहिन्यादेखील या बातम्या देत आहेत. त्यामुळे मला बोलणे भाग पडत आहे. अशी प्रतिमा असणारी व्यक्ती कितीही मोठा कलाकार असला तरीही ‘शक्तीमान’ होऊ शकत नाही. मला ही निवड आवडली नाही”.
यानंतर त्यांनी रणवीरच्या नग्न फोटोशूटवरही भाष्य केले आहे. ते म्हणाले होते की, “जर पूर्ण शरीर दाखवून स्मार्ट बनता येत असेल तर दुसऱ्या देशामध्ये जाऊन रहा. मी निर्मात्यांना देखील म्हणालो की तुमची स्पर्धा कोण्या बॅटमॅन किंवा स्पायडरमॅनशी नाही आहे. शक्तीमान हा केवळ सुपरहिरो नाही तर एक शिक्षकही आहे”.
मुकेश खन्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. यामध्ये काहीजण मुकेश यांच्या मताला पाठिंबा देत आहेत तर काहीजण त्यांच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे.