२०२३ हे वर्ष सर्वांसाठी खास होते. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसाठी तर हे वर्ष खूपच खास होते. यंदाच्या वर्षात शाहरुखचे ‘पठाण’, ‘जवान’ आणि आता नुकताच प्रदर्शित झालेला ‘डंकी’ या चित्रपटामुळे तो चांगलाच चर्चेत आहे. दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्याबरोबर शाहरुख खानने पहिल्यांदाच काम केले आहे. त्यामुळे ‘डंकी’विषयी व राजकुमार हिराणी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
शाहरुख हा सध्या ‘डंकी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून नुकत्याच एका मुलाखतीत त्याने राजकुमार हिराणी यांच्याबरोबर ‘डंकी’आधी २ वेळा काम करण्यास नकार दिल्याबद्दल सांगितले. राजकुमार दिग्दर्शित ‘थ्री इडियट्स’ व ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटांत सर्वात आधी शाहरुखला पसंती देण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव हा योग जुळून आला नाही. पण अखेरीस राजकुमार हिराणी व शाहरुख खान हे ‘डंकी’च्या निमित्ताने एकत्र आले. शाहरुखबरोबर काम करण्यासाठी राजकुमार हिरानी यांना चक्क २० वर्षं वाट पाहावी लागली.
सौदी अरेबिया प्लॅटफॉर्म MBC ग्रुपबरोबर साधलेल्या संवादात शाहरुखने दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ व ‘थ्री इडियट्स’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी तो प्रथम पसंती असल्याचे सांगितले. याबद्दल शाहरुखने असे म्हटले की, “राजकुमार व मी आम्ही खरेतर जुने मित्र आहोत. जेव्हा हिरानी संपादकावरुन दिग्दर्शक बनत होते, त्यावेळी त्यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ची स्क्रिप्ट घेऊन मला संपर्क साधला होता. त्यावेळी मी ‘देवदास’चे शूटिंग करत होतो. मला अजूनही आठवतं, मी ‘देवदास’चा एक सीन शूट करत होतो, ज्यात माझं निधन होणार होतं आणि हिराणी तिथे आले आणि म्हणाले, “माझ्याकडे स्क्रिप्ट आहे” त्यावर मी त्यांना म्हटलं, “ठीक आहे. मी हा चित्रपट करत आहे. आपण परवा भेटू. परंतु, यानंतर माझ्या मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे मला हा चित्रपट करता आला नाही.”

यापुढे शाहरुखने ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाबद्दलचा अनुभव शेअर करताना असे म्हटले की, “काही वर्षांनंतर हिराणी ‘थ्री इडियट्स’साठी पुन्हा माझ्याकडे आले आम्ही स्क्रिप्ट व कास्टिंगवर चर्चादेखील सुरु केली होती. तथापि, खानच्या चित्रपटांना झालेल्या विलंबामुळे आणि पुन्हा उद्धभवलेल्या दुखापतीमुळे पुन्हा एकदा या चित्रपटातील माझी भूमिका अखेरीस आमीर खानकडे सोपवण्यात आली.”
आणखी वाचा – ऋषी कपूर यांना नाना पाटेकरांच्या हातचा खायचा होता खीमा पाव पण…; अभिनेत्याने सांगितला ‘तो’ भावुक प्रसंग
दरम्यान, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ व ‘थ्री इडियट्स’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनेत्याला काही कारणास्तव काम करणे शक्य झाले नव्हते. मात्र, अखेरीस राजकुमार हिराणी शाहरुख खान हे ‘डंकी’ चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र आले. दरम्यान, हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी राजकुमार यांचे व अभिनयासाठी शाहरुखचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.