मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी सायली संजीवची ओळख आहे ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिका, चित्रपटांत काम करत तिने स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. सोशल मीडियावरही तिचा वावर बर्यापैकी मोठा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहत असते. शिवाय आपल्या हटके स्टाईलमुळे ती कायम चर्चेत असते. (Sayali Sanjeev Story)
काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या शिवची गौरी म्हणून सायलीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेपासून सायलीने तिचा अभिनय प्रवास खऱ्या अर्थाने सुरु केला. एखादया विषयाचं ज्ञान घेण्यासाठी झटणारी सायली नेहमीच साऱ्यांच्या पसंतीस पडताना दिसते. छोटा पडदा गाजवल्यानंतर सायलीने तिची पावलं सिनेइंडस्ट्रीकडे वळविली. ‘मन फकिरा’, ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटांमध्ये सायलीने महत्वपूर्ण भूमिका साकारली. आता सायली एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे.
सायलीने शेअर केलेल्या सोशल मीडियावरील एका स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सायलीने सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याची पोस्ट शेअर केली आहे. “सोशल मीडियापासून छोटा ब्रेक घेत आहे. लवकरच परत येईल” असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. सायलीने शेअर केलेल्या या पोस्टने तिच्या चाहत्यांना संभ्रमात टाकलं आहे. सोशल मीडियापासून नेमका ब्रेक सायलीने का घेतला आहे याचं कारण तिने अद्याप दिलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांना हा प्रश्न भेडसावत आहे.
काही महिन्यांपूर्वी देखील सायलीने सिनेमाविश्वातून ब्रेक घेतला होता. हा ब्रेक घेत तिने अभ्यासाचा ध्यास घेतलेला पाहायला मिळाला. सायलीने सोशल मीडिया अकाउंटवरुन अभ्यास करतानाचे पोस्ट करत ‘शिकायचं थांबवू नका’, असं म्हटलं. या फोटोंमध्ये सायलीचा अभ्यासाविषयीचा ध्यास पाहायला मिळाला. सायली राज्यशात्राचा अभ्यास करत होती. ती पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर्स करत होती. सिनेसृष्टीतून ब्रेक घेत तिने शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं होतं.