Dr Prabha Atre Death : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचे निधन झाल्याचे कळले. अत्रे यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जातील. दुर्दैवी गोष्ट म्हणजे आज मुंबईत त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी त्या मुंबईला येणार होत्या, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रभा अत्रे यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा तिन्ही पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका आणि विदुषी म्हणून ओळख असलेल्या डॉ. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या बुजुर्ग गायिका होत्या. पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या त्या शिष्या होत्या. प्रभा अत्रे यांचे संगीताच्या विविध शैलींवर प्रभुत्व होते. ख्याल, ठुमरी, दादरा, गझल यासारख्या विविध गायन प्रकारांत त्यांचे नैपुण्य होते. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात प्रभा अत्रे यांचा खूप मोठा वाटा आहे.
भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर डॉ. प्रभा अत्रे यांनी विशेष अभ्यास केला होता. विदेशातल्या अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शिकवलं होतं. प्रभा अत्रेंनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी संगीत शिकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आई इंदिरा अत्रे यांच्या गाण्यामुळे त्या प्रेरित झाल्या.
डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनानंतर वैभव मांगले यांनी पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे दुःखद निधन. बाप रे काय चाललं आहे हे. आत्ताच राशिद खान गेले. आता प्रभा ताई. अभिजात भारतीय संगीताची भरुन न निघणारी हानी झाली आहे. ताई अद्वितीय होत्या. गाण्यात सरगमचा कसा प्रभावी वापर होतो. त्याच स्थान किती महत्वाचं आहे, सौंदर्यात्मक दृष्ट्या सुद्धा हे त्यांनी पेपर लिहून सिद्ध केलं होतं. त्यांचा सारखा कलावती कुणाचा झाला नाही आणि होणार ही नाही. केवळ अप्रतिम. मारुबिहाग ही अतिउत्तम. या रागांची पारायण केली आहेत. प्रभा ताई तुम्हाला विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली” असं म्हणत त्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे.