‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. या रहस्यमय अशा मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. मालिकेत नेत्रा-अद्वैतच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. तर रुपाली म्हात्रेची नकारात्मक भूमिका लक्षवेधी ठरत आहे. मालिकेत नेत्रा ही भूमिका अभिनेत्री तितीक्षा तावडे साकारत आहे. नेत्रा या पात्रामुळे तितीक्षाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही तितीक्षा बऱ्यापैकी सक्रिय असते. (Titeeksha Tawde Injured)
नेहमीच ती तिच्या चाहत्यांसह काही ना काही शेअर करताना दिसते. अशातच मालिकेच्या सीन शूटदरम्यान तितीक्षाला दुखापत झाली होती. याचा एक व्हिडीओ तिने तिच्या युट्युब चॅनेलवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तितीक्षा टीमसह आउटडोर शूटला असताना एका सीन दरम्यान तिला दुखापत झाली. पाचवी पेटी मिळवण्यासाठी कळसावर चढणे, विरोचकला दरीत ढकलण्याचा सीन शूट करण्यासाठी ते आउटडोरला आले होते. यावेळी सीन शूट करताना तितीक्षाला दुखापत झाली.
तितीक्षाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिला दुखापत झाल्याबद्दल सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये तितीक्षा असं सांगत आहे की, “एका सीनच्या दरम्यान सीन झाल्यावर मी बाहेर जात होते आणि मी फिरुन बाहेर गेले तेव्हा मला कळलं नाही की माझ्या मागेच कॅमेरा होता. आणि तो कॅमेरा माझ्या वरच्या ओठावर जोरात आपटला. त्यानंतर तात्काळ मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. सुरुवातीला मला वाटलं ही दुखापत जास्त झाली आहे. दात वगैरेही पडला असेल पण तसं काही नव्हतं. रक्त पडल्याने मी थोडी घाबरले होते. डॉक्टरांनी टाके मारायला सांगितलं. पण आधी शूट पूर्ण करायचं मी ठरवलं. आणि घरी मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्यायचं ठरवलं. पुन्हा मी सीन शूट केला. खरंतर एक सीन मी करणार होते पण माझ्या ओठाची दुखापत आणि रक्तप्रवाह पाहून तो सीन ऐश्वर्या ताईने केला”.
त्यानंतर तितीक्षाचा नवरा सिद्धार्थ तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. ओठाला थोडी सूज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पुढे तितीक्षा म्हणाली, “मला दोन टाके पडले आहेत. मला जास्त बोलता येत नाही आहे”. तितीक्षाला बोलता येत नव्हतं आणि तिने आराम करावा म्हणून सिद्धार्थ तिला ओरडतानाही दिसला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तितीक्षा ऑन टाइम सेटवर चित्रीकरणाला पोहोचली. तितीक्षाच्या बोलण्यावरुन तिला बरं वाटलं नसल्याचंही दिसलं.