छोट्या पडद्यावरील मालिका या अनेक प्रेक्षकांच्या आवडीचा विषय असतात. त्यामुळे प्रेक्षक आपल्या आवडत्या मालिकांबद्दल, मालिकांमधील पात्रांबद्दल त्यांना आवडत असलेल्या किंवा आवडत नसलेल्या गोष्टींबद्दल त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. मालिकेतील पात्र, मालिकेची कथा आवडत असल्यास त्यावर आपलं मत व्यक्त करतात. मात्र काही नवीन ट्विस्ट किंवा नवीन वळण प्रेक्षकांना आवडले नाही, तर त्याबद्दल ते आपली नाराजीही व्यक्त करतात. अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका.
मालिकेत नुकतेच एक मोठे वळण आले असून या नवीन वळणामुळे ही मालिका अनेकांच्या नाराजीचे कारण झाली आहे. रुपालीला संमोहित करण्याची शक्ती मिळाली असून या शक्तीद्वारे तिने घरतील सर्वच सदस्यांना वश केलं आहे. विरोचकांच्या या शक्तीविरुद्ध नेत्रा व इंद्राणी या त्रिनयना देवीच्या लेकींना लढताच येतं नाही आहे आणि हीच गोष्ट प्रेक्षकांना खटकत आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडून यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
अशातच आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये राजाध्यक्ष कुटुंबियांना विरोचकाच्या तावडीतून सोडवता येत नसल्यामुळे नेत्रा हतबल झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रोमोखाली एका नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “मालिकेतली विकृती खूपच वाढली आहे, बघवत नाही आता. अंधविश्वास आणि जादू टोण्याला प्रवृत्त करणारी मालिका” तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की, “मालिकेची कथा ही अजिबात पुढे जाणारी नसून मालिकेत तेच तेच दाखवले जात आहे.”

तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली “बंद करा ही मालिका, एक भरकटलेली मालिका, कथानकाला काही ताळतंत्रच नाहीये, अरे देवा, एवढी राक्षसी वृत्ती?, त्रिनयना देवी कधी जागी होणार?, कृपया आता बंद करा ही मालिका, ही मालिका आता अजिबात बघवत नाहीये” अशा अनेक कमेंट्स करत मालिके व सध्या सुरु असलेल्या कथानकाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.