झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे. या कार्यक्रमामध्ये सुत्रसंचालक अवधूत गुप्ते उपस्थितांना रोखठोक प्रश्न विचारताना दिसतो. आतापर्यंत कलाक्षेत्रातील मंडळींसह काही राजकीय मंडळींनी ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या गेल्या भागामध्ये अभिनेता जितेंद्र जोशी उपस्थित होता. यावेळी त्याने अनेक प्रश्नांची बेधडक उत्तरं दिली. दरम्यान जितेंद्रचे सगळ्यात जवळचे मित्र संजय मोने या मंचावर आले. त्यांनी जितेंद्रबाबत खुपणाऱ्या गोष्टी सांगितल्या.
संजय मोने यांना “जितेंद्रची सगळ्यात खुपणारी गोष्ट सांगा” असं अवधूत गुप्ते म्हणाला. यावर ते म्हणाले, “जितेंद्रची सगळ्या खूपणारी गोष्ट म्हणजे तो वाहून जातो. वाईट अर्थाने नव्हे पण तो एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःला वाहून नेतो. जगातला कोणताच माणूस पूर्णपणे सच्चा नसतो. कलाकारांमध्ये खोटेपणा असतोच असतो. त्याशिवाय तो कलाकार होत नाही. फक्त त्या कलाकारामध्ये खोटेपणाचं प्रमाण जितकं कमी-जास्त असतं तितकं त्याला आपण मोठे मानतो”.
आणखी वाचा – “जो भी होगा, देखा जायेगा,” संतुर जोडी नारकर कपलचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “नारकर साहेब…”
“खोटेपणा करुन पैसा मिळवणं हा कलाकाराचा व्यवसाय आहे. त्यामुळे कलाकार चलाख असतो. पण जितेंद्र त्यामध्ये वाहून जातो. आम्ही एकदा पुण्यावरुन प्रयोग करुन येत होतो. खूप पाऊस पडत होता. हा घाटामध्ये उतरला आणि म्हणाला मी जातो. मुक्ता बर्वे व आमचे मॅनेजर आमच्याबरोबर होते. मॅनेजर त्याला अडवत होते. पण मी म्हटलं, जितेंद्र तू परवा प्रयोगाला येशील ना?. गाडी पुढे गेल्यानंतर मुक्ताने मला विचारलं की, तुमच्यामध्ये काय बोलणं झालं?. मी तिला काही नाही म्हणून उत्तर दिलं”.
आणखी वाचा – “महिनाभर तिच्या पायाला प्लास्टर करण्यात आलं होत…” क्रांतीच्या लेकीला दुखापत, म्हणाली “अजूनही…”
“जितेंद्र आता उतरुन कुठे जात आहे? असा प्रश्न तिने मला पुन्हा विचारला. मी तिला बोललो तो माथेरानला जात आहे. म्हणजे तो न बोलता मला कळालं होतं. अजून एक गोष्ट मला त्याच्याबाबत खुपते. कुठेतरी आपला अपमान झालेला असतो. तर आपल्या मनात ते असतं. कुठेतरी अपमान केलेल्या व्यक्तीचा हिशोब चुकता करणार हा विचार आपल्या मनात येतो. बहुसंख्य लोक त्यांचा अपमान केलेल्या लोकांना धडा शिकवतात. पण जितेंद्र तसा नाही. चांगलं किंवा वाईट त्याची परतफेड ही झालीच पाहिजे. फक्त चांगलं असून उपयोग नाही. हे असं झालं आहे तरीही मी तुझ्याशी चांगलं वागत आहे हे समोरच्याला जाणवून देणं गरजेचं आहे”. या दोघांमध्ये किती घट्ट मैत्री आहे या मंचावर दिसून आलं.