पाकिस्तानचा क्रिकेट स्टार शोएब मलिकने प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदबरोबर लग्न केले आहे. शोएबबे स्वत: त्याच्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. नुकतंच शोएबने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे म्हणजेच निकाहचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा व तिचा पती शोएब मलिक यांच्यात घटस्फोट झाल्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. अशातच आता शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नावर सानिया मिर्झाच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “सानियाने शोएबला खुला घटस्फोट दिला. मुस्लिम महिलांच्या अधिकारांनुसार खुला म्हणजे मुस्लिम महिला तिच्या पतीला स्वतःच घटस्फोट देते.
तलाक आणि खुला यात फारसा फरक नाही. जेव्हा एखादी स्त्री विभक्त होण्याचा निर्णय घेते तेव्हा त्याला खुला म्हणतात. जेव्हा हा निर्णय पुरुषाच्या बाजूने येतो तेव्हा त्याला घटस्फोट म्हणतात. त्यामुळे विभक्त होण्याचा निर्णय सानियानेच घेतला होता, हे सानियाच्या वडिलांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.
दरम्यान, सानिया मिर्झा व शोएब मलिक हे गेल्या काही महिन्यांपासून एकत्र दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा अफवा पसरल्या होत्या. शोएब व सानियाला पाच वर्षांचा मुलगाही आहे जो सानियाबरोबर राहतो. तर शोएबने लग्न केलेली २८ वर्षीय सना जावेद ही पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे, तिच्या नावे ‘ए मुश्त-ए-खाक’, ‘डंक’ यांसारखे अनेक प्रसिद्ध शो आहेत. याशिवाय ती अनेक गाण्यांमध्येही झळकली आहे.