मराठी मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे मुंबईचे स्थानिक नसून कामानिमित्त मुंबईत येत असतात. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून अनेक कलाकार मंडळी या सिनेसृष्टीत त्यांचे नशीब आजमावण्यासाठी येत असतात. पण मुंबईत त्यांना स्वत:चे घर नसल्यामुळे नातेवाईक किंवा मित्रमंडळींकडे राहावं लागतं. त्यामुळे मुंबईत घर घेणे हे त्यांचे स्वप्न असते आणि याच स्वप्नपूर्तीसाठी ते कलाकार मेहनत घेत असतात. असेच नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झालेला अभिनेता म्हणजे रोहित माने.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून ‘साताऱ्याचा विनोदी तारा’, ‘देशी हॉटनेस’ अशा अनेक बिरुदांनी लोकप्रिय असलेल्या रोहित मानेने त्याच्या नवीन घराची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर करत घराची झलकही दाखवली आहे. या पोस्टखाली त्याने असे म्हटले आहे की, “मी साताऱ्यात जन्माला आलो. तिथेच वाढलो. माझे वडील कामानिमित्त मुंबईत असायचे आणि आम्ही गावी. कुटुंबापासून किती दिवस लांब राहायचं म्हणून माझ्या बाबांनी आम्हाला मुंबईत आणलं. लहानपणापासून आम्ही बऱ्याच घरांमध्ये राहिलो, काही घरं आवडत नसतानाही नाईलाज म्हणून राहावं लागलं आणि काही घरं खूप आवडत असतानाही नाईलाज म्हणून सोडावी लागली. त्या सगळया प्रवासात एक स्वप्न कायम सोबत असायचं आणि ते म्हणजे स्वतःचं हक्काचं घर असावं जे नाईलाज म्हणून सोडावं लागणार नाही आणि मनासारखं सजवता येईल”.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “बरं त्यात निवडलेलं क्षेत्र इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की, कधी घर घेण्याची हिंमतही झाली नाही. पण श्रदधा तुझ्याबरोबर लग्न झालं आणि ज्या हिंमतीने तू सगळं हातात घेतलंस त्यामुळे आणि त्यामुळेच हे शक्य झालं आहे. ही हिंमत आम्हाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने दिली. आता मी हक्काने सांगू शकतो होय हे आमचं घर आहे. स्वप्नपूर्तीचा हाच तो अनुभव”.
यापुढे त्याने त्याच्या नवीन घराबद्दल आई-वडिल, सासू-सासरे यांचे आभार मानत असे म्हटले आहे की, “या सगळयात माझे आई-वडील, माझे सासू-सासरे, यांनी कायमच आम्हाला दिलेली साथ मी कधीच विसरु शकणार नाही. तुम्हा सगळ्यांचे आर्शिवाद आणि शुभेच्छा कायम आमच्या सोबत असू दया. कायम असंच प्रेम करत रहा. या प्रवासात बरोबर असणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत. एका स्वप्नाचा प्रवास पूर्ण होत आहे. पुढच्या स्वप्नांकडे जाण्याचा ध्यास ठेवून…”. दरम्यान, रोहितने पोस्ट शेअर करताच त्याच्यावर अक्षया गुरव, पृथ्वीक प्रताप, प्रथमेश परब, रसिका वेंगुर्लेकर, ऋतुजा बागवे, स्नेहल शिदम यांमसारख्या अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी कमेंट्सद्वारे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.