कलर्स मराठी वाहिनीवरील ‘योग योगेश्वर जय शंकर’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. या मालिकेतून शंकर महाराजांची जीवनकथा सादर करण्यात आली होती. ज्यामध्ये बालकलाकार आरुष बेडेकर व त्यानंतर संग्राम समेळ यांनी शंकर महाराजांची भूमिका साकारली होती. दोघांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं होतं. मात्र, अचानक या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत. अशातच, मालिकेत शंकर महाराज यांची भूमिका साकारणारा अभिनेता संग्राम समेळने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. (Sangram Samel emotional Post on Yog Yogeshwar Jay Shankar Serial)
‘योग योगेश्वर जय शंकर’ या मालिकेने नुकताच अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला असून शनिवारी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. त्यानिमित्त अभिनेता संग्राम समेळने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये मालिकेच्या प्रवासाबद्दल सांगताना मालिकेतील संपूर्ण टीमचे व त्याच्या कुटुंबियांचे आभार मानले.
संग्राम या पोस्टमध्ये म्हणाला, “आणि तो अद्भुत प्रवास संपला. या प्रवासात मला एक कलाकार आणि एक माणूस म्हणून महाराजांनी खूप शिकवलं. व्यक्तिशः महाराजांची भूमिका करणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं, मानसिकरीत्या आणि शारीरिकदृष्ट्या. पावलोपावली महाराज माझी परीक्षा घेत होते, पण तरीही मला सांभाळायला आपली माणसे खंबीर होती. मी कधीही घरापासून इतका काळ लांब राहिलो नव्हतो आणि यावेळी सुद्धा बाहेरगावी मालिका करण्याची माझी मनाची तयारी नव्हती. पण ही भूमिका करण्यासाठी माझ्या पत्नीने मला तयार केलं. नुसतं तयार केलं नाही, तर तिने ९ महिने हे घर खंबीरपणे सांभाळलं. माझ्या ८६ वर्षाच्या आजीला सांभाळलं.”
“कितीतरी वेळा स्वतःच्या करिअरकडे दुर्लक्ष करून तिने घर सांभाळलं. जेणेकरून मला माझं काम नीट करता यावं आणि माझे आई-बाबा जे सतत आम्हा दोघांच्या पाठीशी होते, त्यांनी आम्हाला कधीही खचू दिलं नाही. मी लांब असण्याची त्यांची तळमळ कधीही माझ्यापर्यंत पोहोचू दिली नाही, जेणेकरून मला माझे १०० टक्के काम देता यावेत. माझे आई-बाबा म्हणजे माझे पहिले समीक्षक, ज्यांनी वेळोवेळी माझं कौतुकही केलं. अन् जिथे मी कमी पडलो तिकडे कान पण धरले कारण मला त्यांनीच सगळं शिकवलंय.”, असं म्हणत त्याने त्याच्या कुटुंबियांचे आभार मानले.
हे देखील वाचा – Video : मायरा वायकुळने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भर गर्दीत तिच्या एका कृतीने सगळ्यांचीच जिंकली मनं, नेटकरी म्हणाले, “संस्कार खूप…”
पुढे तो मालिकेच्या संपूर्ण प्रवासाबद्दल म्हणाला, “‘शंकर महाराज आता मोठे होणार आहेत. तू निर्मात्यांना फोन कर’, असं सांगणारा माझा मित्र आणि या मालिकेच्या दोनशेहून अधिक भागांचा संवाद लेखक समीर काळभोर, माझं नाव सुचवणारा विजय साबळे आणि निर्माते संजय झणकर सर यांनी माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास ठेवला आणि मला त्यांच्यासह पुन्हा काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. सर तुमच्यासारखी गोड माणसं दुर्मिळच. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं, त्या आमच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार. आमचे उत्तम दिग्दर्शक विठ्ठल डाकवे, सचिन गोताड, बाबा केंद्रे सर तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं.”, असं म्हणत त्याने छायाचित्रकार, निर्मिती टीम, मेकअप टीम व वेषभूषाकार व सहकलाकारांचेदेखील आभार मानले. त्याचबरोबर “तुझ्या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहतोय”, असं सांगताना त्याने मालिकेचा सह-निर्माता अभिनेता चिन्मय उदगीरकरचेही आभार मानले.
हे देखील वाचा – Video : “मी योग्यवेळी येऊन…”, क्रांती रेडकरच्या मुलीने कापले स्वतःचेच केस; म्हणाली, “काय तर म्हणे…”
“कलर्स मराठी वहिनीच्या पहिल्या काही मालिकांपैकी एक “असावा सुंदर स्वप्नांचा बंगला” पासून मी त्यांच्यासह काम करतोय, पण या भूमिकेसाठी मी तुमचा वाहिनीचा आजन्म ऋणी राहीन.” असं म्हणत शेवटी त्याने वाहिनीचे आणि रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल होत असून चाहते कमेंटद्वारे त्याचे कौतुक करताना दिसत आहे.