महाराष्ट्रासह जगभरात प्रत्येकाच्या घराघरात पहिला जाणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा. प्रत्येकाच्या आयुष्यात मनोरंजन फुलवणारा हा कार्यक्रम आज अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. या कार्यक्रमातील कलाकार त्यांच्या हटके विनोदशैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम ओळखला जातो तो म्हणजे सतत होणारी वैविध्यपूर्ण विनोद निर्मिती आणि या विनोद निर्मितीला कलाकारांसह दिग्दर्शक,लेखक यांचा ही मोठा सहभाग असतो. आज हास्यजत्रेत असेच बहारदार विनोद निमिर्ती करणारे हास्यजत्रेचे लेखक, दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांचा वाढदिवस.(Sachin Goswami Birthday Special)
सचिन गोस्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता समीर चौघुलेने खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. समीरने गोस्वामी यांच्या बरोबरचा एक फोटो शेअर करत “Some pictures do not need any caption…अफाट, अचाट आणि अद्वितीय सचिन गोस्वामी सर…वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…सर तुम्ही आहात म्हणून शिकणं सुरू आहे…..घडणं सुरु आहे…एका जागी साचणं बंद आहे… पुन्हा एकदा खूप शुभेच्छा …” असं कॅप्शन देखील दिलं आहे.
या पोस्टमधून समीरने सचिन गोस्वामी यांच्याबद्दल असलेला आदर, प्रेम या भावना व्यक्त केल्या आहेत. सचिन गोस्वामी यांच्यामुळे सतत माझं नवीन गोष्टी शिकणं सुरु आहे. मी रोज नव्याने घडत आहे. एका जागी कुठे अडकून राहिलो नाही अशा आशयाची पोस्ट समीरने शेअर केली आहे. समीरच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी तसेच चाहत्यांनी देखील कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली सुरु असलेली हास्यजत्रा आज देशभरात प्रचंड प्रमाणात पहिली जात आहे. हास्यजत्रेचे अनेक मिम्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
सध्या हास्यजत्रेचा परदेश दौरा ही प्रचंड गर्दीत सुरु आहे. समीर चौघुले, वनिता खरात, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, गौरव मोरे यांच्यासह अन्य कलाकारांच्या धमाल विनोद निर्मितीमुळे महाराष्ट्रभर हास्यजत्रेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. दिग्दर्शक सचिन गोस्वामी व सचिन मोटे यांच्या दिग्दर्शनामुळे हास्यजत्रा आहे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. सध्या हास्यजत्रेचा हा ऑस्ट्रेलिया दौरा चांगलाच गाजतोय. प्राजक्तासह अभिनेता प्रसाद खांडेकरने देखील या दौऱ्यातील अनेक फोटो शेअर केले आहेत.