कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संभाजीराजे छत्रपती यांना ओळखलं जातं. वर्षानुवर्षे चालत आलेलं वंशज सांभाळत व राजकीय घडामोडी करत त्यांनी कायमच प्रेक्षकांमध्ये आपली छाप पाडली. मराठा आरक्षण व गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या लढ्यात ते अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. आपले विचार, आपली भूमिका न घाबरता स्पष्टपणे मांडण्यात ते कधीही मागे हटले नाहीत. शिवाय आजवर त्यांनी त्यांच्या कामात कोणतीही हयगयही केली नाही. (Sambhajiraje Chhatrapati)
जनतेशी कायमच आपुलकीने वागणारे संभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर जाणारे कोल्हापूरचे पहिले खासदार म्हणून ओळखले गेले. राजकारणानंतर आता संभाजीराजे लवकरच एका वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. त्यांच्या एका नव्या इनिंगसाठी ते सज्ज झाले आहेत. ही इनिंग म्हणजे अभिनय. संभाजीराजे छत्रपती लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांना एका मराठी सिनेमात भूमिका करण्याची ऑफरही मिळाली असल्याचं समोर आलं आहे.
नुकतीच संभाजीराजांनी ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी त्यांच्या या नव्या इनिंगविषयी भाष्य केलं. लोकप्रिय मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी संभाजीराजांना त्यांच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. नागराज हे सध्या त्यांच्या ‘खाशाबा’ या चित्रपटावर काम करत आहेत. नागराज मंजुळे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना ‘खाशाबा’ या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे.
मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितलं की, “मला काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळेंचा फोन आला होता. ते लवकरच खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. खाशाबा जाधव यांना त्यावेळी आमचे आजोबा शहाजी महाराजांनी आर्थिक मदत केली होती. त्यामुळे शहाजी महाराजांची भूमिका तुम्ही करु शकता का? असं त्यांनी मला विचारलं. माझी चेहरेपट्टी, आवाज, माझं नाक यात त्यांना बरंच साम्य जाणवलं. त्यामुळे ही भूमिका मी करावी असा त्यांचा आग्रह होता. त्यानुसार मी आमचे आजोबा शहाजी महाराजांची भूमिका स्वीकारली आहे” असं ते म्हणाले.