यामी गौतमने नुकतीच एक खुशखबर चाहत्यांसह शेअर केली आहे. अभिनेत्री आई होणार असल्याची आनंदाची बातमी तिने चाहत्यांसह शेअर केली आहे. या आनंदाच्या बातमीनंतर आता यामीबाबतची आणखी एक बातमी समोर आली आहे. यामी गौतमचा आगामी चित्रपट ‘आर्टिकल ३७०’ च्या ट्रेलरने काही वेळातच धुमाकूळ घातला आहे. देशाच्या सर्वात सुंदर भाग काश्मीरशी संबंधित कलम ३७०च्या ज्वलंत मुद्द्यावर आधारित ‘आर्टिकल ३७०’ चित्रपट अवलंबून आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आदित्य सुहास जांभळे यांनी सांभाळली असून यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातून ही अभिनेत्री आता मोठ्या पडद्यावर खळबळ उडवणार असल्याचं चित्र ट्रेलरवरुन पाहायला मिळत आहे. (Article 370 Official Trailer)
‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत लिहिलं आहे की, “संपूर्ण काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि राहील. या ट्रेलरमध्ये यामी एका NIA अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे, ज्याला काश्मीरमध्ये कलम 370 नंतर शांतता प्रस्थापित करण्याची तसेच दहशतवाद्यांची मोहीम अयशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे”. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘रामायण’ या टीव्ही मालिकेतील रामची भूमिका साकारणारा अरुण गोविल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसत आहे. “आम्ही कलम ३७० आणू” असंही ते बोलताना दिसत आहेत.
ट्रेलरची सुरुवात काश्मीर खोऱ्याच्या नयनरम्य दृश्याने झाली. यामी गौतमचा आवाज येत ती असं बोलत आहे की, “काश्मीर एक हरवलेली केस आहे, मॅडम. जोपर्यंत हा विशेष दर्जा आहे तोपर्यंत आपण त्यांना स्पर्शही करु शकत नाही”. यानंतर स्क्रीनवर प्रियमणी दिसत आहे आणि यामी तिच्यासमोर असं म्हणताना दिसत आहे की, ‘ते आम्हाला कलम ३७०ला स्पर्शही करु देणार नाहीत’. यानंतर काही मुले हातात बंदुका घेऊन गुंडगिरी करताना दिसतात.
यामीने या चित्रपटाचे भारताच्या इतिहासातील एक साहसी अध्याय असे वर्णन केले आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल आणि त्याच्या कामाचे कौतुक होईल, अशी आशा चित्रपटाचा ट्रेलर पाहून व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेत्री म्हणाली आहे की, “या चित्रपटाने तिला अशा भूमिकेत प्रवेश करण्याची संधी दिली जी तिला यापूर्वी कधीही मिळाली नव्हती”.