मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री छाया कदम. मराठीतील सुपरहिट चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या छाया या सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. छाया यांच्या आईचं निधन झालं आहे. सोशल मीडियाद्वारे आईबरोबरचा फोटो शेअर करत त्यांनी स्वतः ही माहिती दिली. तसेच आईला श्रद्धांजली वाहत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणं बऱ्याच कलाकारांना आवडतं. त्यापैकीच एक छाया आहेत. आईच्या निधनानंतर त्यांनी आपलं दुःख चाहत्यांबरोबर शेअर केलं. त्याचबरोबरीने आईवर असणारं प्रेम तसेच जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. छाया यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची आई त्यांच्याकडे अगदी हसतमुख चेहऱ्याने बघताना दिसत आहे.
छाया फोटो शेअर करत म्हणाल्या, “आई आज तुला जाऊन दोन आठवडे झाले. नाही अगं तू कायमच माझ्याबरोबर आहेस आणि असशीलच. मुंबईतल्या घरातील तू जपलेल्या समई व जात्यात तू असशील. गावातल्या अंगणातील चाफ्याच्या झाडातही तू असशील. माझ्या कामात आणि तूच मला दिलेल्या प्रत्येक स्वातंत्र्यात तू कायम असशील. मिस यु मम्मुडी. लव्ह यु मम्मुडी”.
छाया यांनी पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळींनीही त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. छाया यांनी आजवर ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘न्यूड’ सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्या फक्त मराठी चित्रपटांपुरताच मर्यादित राहिल्या नाहीत. त्यांनी बॉलिवूडमध्येही उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली.