बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सैफ अली खानला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आल्यापासून त्याचे चाहते विविध प्रकारचे अंदाज लावताना दिसत आहेत. शूटिंगदरम्यान जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे ही समोर आले आहे. सूत्रांच्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, अभिनेत्याच्या गुडघ्यावर व खांद्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्याचा खांदा व गुडघा फ्रॅक्चर झाला असल्याचं समोर आलं. (Saif Ali Khan Admit)
दरम्यान मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात सैफ अली खानला दाखल करण्यात आले. तेथेच त्याच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण झाली. अभिनेत्री करीना कपूर पतीबरोबर हॉस्पिटलमध्ये हजर होती. ‘आज तक’च्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, ‘अभिनेत्याला अचानक शस्त्रक्रियेची फारशी गरज नव्हती. तो ही शस्त्रक्रिया पुढे ढकलत होता. अभिनेत्याची दुखापत फारशी गंभीर नाही. तो आता निरोगी आहे. काळजी करण्यासारखे आता काही कारण नाही.
सैफ अली खानने त्याच्या चाहत्यांचे आभार व्यक्त करत आपली शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याचे सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता यापूर्वीही जखमी झाला होता. मागे ‘रंगून’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाला होता. त्यावेळी अभिनेत्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. आता अभिनेता सैफ अली खान पुन्हा जखमी झाला असून त्याचा खांदा व गुडघ्याला फ्रॅक्चर झाले असल्याचं समोर आलं आहे.
सैफ अली खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सैफ अली खान चित्रपटांमधील भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. २०२३ मध्ये ‘आदिपुरुष’ चित्रपटातील रावणाच्या भूमिकेमुळे तो विशेष लोकप्रिय झाला. याशिवाय तो आगामी तेलुगू चित्रपट ‘देवरा’ व हिंदी चित्रपट ‘गो गोवा गॉन’ मध्ये दिसणार आहे.