Bollywood Actor Saif Ali Khan Attacked : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे. बुधवारी रात्री त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. गेले काही दिवस तो चोर सैफ अली खानच्या घराची टेहाळणी करत होता. चोरीच्या उद्देशाने तो अज्ञात व्यक्ती अभिनेत्याच्या घरात शिरला होता. मिळालेल्या माहितीनुसार सैफची मुलं ज्या खोलीत झोपलेली त्यात खोलीत चोर उडी मारुन आला होता. चोराची चाहूल सैफच्या मुलांच्या नॅनीला झाली, त्यामुळे तिन लगेचेच आरडाओरड सुरु केली. यावेळी सैफला जाग आली आणि तो बाहेर आला. त्याक्षणी चोर आणि सैफ आमनेसामने आले. आपण पकडले जाऊ या भीतीने चोराने सैफवर हातात असलेल्या धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली. (Saif Ali Khan Team Official Statement)
सैफला सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर काही मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि पुढील उपचार सुरु आहेत. यावर आता त्याच्या टीमकडूनही अधिकृत भाष्य समोर आले आहे. सैफच्या हल्ल्यासंदर्भात टीमने असं म्हटलं आहे की, “सैफ अली खानवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून तो धोक्याबाहेर आहे. सध्या तो बरा झाला असून डॉक्टर त्याच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सुखरुप आहेत आणि पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आम्ही डॉ. निरज उत्तमानी, डॉ. नितीन डांगे, डॉ. लीना जैन आणि लीलावती रुग्णालयातील सर्व टीमचे आभार मानू इच्छितो. तसंच सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे त्यांनी केलेल्या प्रार्थनांबद्दल आभार”.

सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी मुंबई क्राइम ब्रँचची टीम सैफ अली खानच्या घरी पोहोचली. फॉरेन्सिक टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी सैफच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांची चौकशी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांनी हल्लेखोराला दुसऱ्या इमारतीच्या कंपाउंडमधून सैफच्या इमारतीत उडी मारताना पाहिले आहे. या प्रकरणाचा छडा लावण्याच्या अगदी जवळ असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
आणखी वाचा – सैफ अली खानच्या घरी नेमक्या कोणत्या गोष्टी चोरी करण्याचा प्रयत्न?, घरात आहेत एकापेक्षा एक मौल्यवान वस्तू
तसंच मुंबई पोलीस सैफ अली खानच्या मोलकरणीचा जबाब नोंदवणार आहेत. या हल्ल्यात मोलकरीणही जखमी झाली असून तिच्यावरही उपचार सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना मोलकरणीवर संशय आहे. तिनेच चोरट्याला घरात प्रवेश दिला असावा असं म्हटलं जात आहे. “आम्ही मीडिया आणि चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी संयम राखावा आणि अधिक अंदाज लावू नये कारण पोलिस आधीच त्यांचा योग्य तपास करत आहेत. तुमच्या काळजीबद्दल सर्वांचे आभार” असं करीनाच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे.