बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने अवघ्या मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे. बुधवार (१५ जानेवारी) रोजी रात्री २ च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर, त्याने सैफ अली खानच्या घरातील नोकर आणि अभिनेत्याशी भांडण केले. या बाचाबाचीत अभिनेता जखमी झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र, चोरट्यांनी काय चोरले? किंवा ते काय चोरी करण्यासाठी आले होते?, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. बॉलिवूड अभिनेता असण्याबरोबरच सैफ अली खान हा एक श्रीमंत आणि नवाबी कुटुंबातून येतो. (Saif Ali Khan net worth)
अभिनेता सैफ अली खानकडे किती संपत्ती आहे? आणि त्याची प्रॉपर्टी कुठे आहे? याबद्दल काही माहिती समोर आली आहे, त्याची संपत्ती नेमकी किती आहे? चला जाणून घेऊया… सैफ अली खान हा पतौडी घराण्याचा सध्याचा नवाब आहे. CNBC TV18 च्या वृत्तानुसार, सैफ अली खानची एकूण संपत्ती १२०० कोटी रुपये आहे. यात त्याच्या चित्रपटाची फी, ब्रँड प्रमोशन, गुंतवणूक, व्यवसाय उपक्रम आणि आलिशान पतौडी पॅलेसचा समावेश आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खान प्रत्येक चित्रपटासाठी दहा ते पंधरा कोटी रुपये घेतो. दुसरीकडे, तो ब्रँड एंडोर्समेंटसाठी एक ते पाच कोटी रुपये घेतो.
२०२२ मध्ये ‘फोर्ब्स’ला दिलेल्या मुलाखतीत सैफने खुलासा केला होता की, तो अनेक ठिकाणी गुंतवणूक करुन आपली संपत्ती वाढवत आहे. विशेषत: त्यांनी हरियाणामधील आलिशान पतौडी पॅलेस एका हॉटेल मॅनेजमेंट कंपनीला भाड्याने दिला होता, ज्यातून त्यांना प्रचंड उत्पन्न मिळाले. सैफला वारशाने मिळालेली सर्वात महाग मालमत्ता म्हणजे त्यांचे पतौडी पॅलेस. या राजवाड्याला ‘इब्राहिम कोठी’ असेही म्हणतात. पतौडीचे सत्ताधारी नवाब, पतौडीचे आठवे नवाब इफ्तिखार अली खान यांनी लग्न केल्यानंतर हा राजवाडा बांधला.
मन्सूर अली खान यांच्या निधनानंतर आता पतौडी पॅलेसचा मालक सैफ अली खान आहे. १० एकर जागेवर पसरलेल्या पतौडी पॅलेसची किंमत तब्बल ८०० कोटी रुपये आहे. यात एकूण ७ बेडरूम, ७ ड्रेसिंग रूम, ७ लाउंज, ७ बिलियर्ड्स रुम, अनेक डायनिंग रुम, ड्रॉइंग रूम आणि बरेच काही आहे. या आलिशान महालात रणबीर कपूरचा ॲनिमल (2023), मेरे ब्रदर की दुल्हन (2011), मंगल पांडे (2005) आणि वीर झारा (2004) यासारख्या अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले होते.