घरात बाळ असल्यावर त्याच्याबद्दलची सर्वात कठीण गोष्ट म्हणजे रात्री त्याला झोपवणं. बाळाला व्यवस्थित झोप लागली नाही तर अनेक पालकांच्याही झोपेचं वेळापत्रक गडबडतं. त्यामुळे बाळासाठी आणि त्याच्या झोपेसाठी त्याचे पालक नवनवीन युक्ती लढवत असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन मराठी अभिनेत्री सई लोकुरने तिच्या बाळासाठगी एक खास पाळणा केला आहे आणि हा पाळणा नेहमीसारखा नसून वेगळ्या प्रकारचा आहे.
‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून सई ही तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. सई लोकूर ही आई झाली आहे. सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी सईला कन्यारत्न प्राप्त झाले. अभिनेत्री आई झाल्यानंतर तिच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. सई ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे व तिच्या बाळाबरोबचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. तसेच ती तिच्या बाळाबद्दलची माहितीही शेअर करत असते.

नुकतंच सईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे “तुम्ही नवीन आणि वेगळ्या गोष्टी वापरून पहाल की लोक अनेक वर्षे जे करत आले आहेत त्याचे अनुसरण कराल?” असा प्रश्न विचारला होता. यावेळी तिने तिच्या लेकीसाठी पाळण्याची जुनी पद्धत न स्वीकारता नवीन पद्धतीचा पाळणा बनवला असल्याचे म्हटले आहे. यावेळी तिने असं म्हटलं की, “मी जुना पारंपारिक पाळणा न स्वीकारता आधुनिक पद्धतीचा पाळणा केला आहे. मला ताशी नावाची मुलगी आहे आणि मी तिच्या सजावटीसाठी निळ्या रंगाची थीम निवडली आहे. मला तोच तोच साचेबद्धपणा व जुनाट पद्धत सोडून काहीतरी नवीन करायला नेहमीच आवडते”.
दरम्यान, सईने तिच्या लेकीसाठी अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीचा पाळणा केल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये हा सामान्य पद्धतीचा हलता पाळणा नसून एका जागी ठेवण्याचा हा पाळणा आहे. यामध्ये बाळाला झोपण्यासाठी मऊ अच्छादन पांघरलेलेदेखील पाहायला मिळत आहे.