बॉलिवूड कलाकार त्यांच्या लूकबाबत खूप गंभीर असतात. विविध व हटके डिझाइन फॉलो करत ते नेहमीच ट्रेंडिंग लूक फॉलो करत चाहत्यांसह शेअरही करतात. एखादा लूक कॅरी करताना प्रत्येक कलाकार मेकअपची आणि ड्रेसची विशेष काळजी घेतो. आकर्षक दिसण्यासाठी ही कलाकारनेहमी काहीतरी नवीन करत असतात. बहुतेक अभिनेते किंवा अभिनेत्री एखादा ड्रेस एकदा घातल्यानंतर पुन्हा परिधान करत नाहीत. अलीकडेच एका मुलाखतीत अभिनेता आयुष्मान खुरानाने बॉलिवूडमध्ये भाड्याने ड्रेस घेण्याच्या ट्रेंडबद्दल सांगितले. (Ayushmann Khurrana On Bollywood Style)
यावेळी अभिनेत्याने बॉलिवूड स्टार्सच्या कपड्यांबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्याने सांगितले की, “हे एक गुपित आहे. बहुतेक बॉलीवूड सेलिब्रिटी ट्रेंडमध्ये राहण्यासाठी कपडे विकत घेण्याऐवजी भाड्याने घेतात”. यादरम्यान त्याने त्याचा भाऊ आणि अभिनेता अपारशक्ती खुराणा यांच्याशी संबंधित एक किस्साही शेअर केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाड्याच्या कपड्यांच्या ट्रेंडबद्दल बोलताना अभिनेता एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “संपूर्ण बॉलिवूड भाड्यावर आहे. आम्ही कपडे खरेदी करतो असे तुम्हाला वाटते?, आम्ही स्टायलिस्ट ठेवतो, त्यांच्याकडून कपडे घेतो आणि त्यांना परत करतो. इतके कपडे कुठून आणणार?”, असं तो म्हणाला.
दिलजीत दोसांझच्या स्टाईलचे आणि त्याची स्टाईल जागतिक दर्जापर्यंत पोहोचल्यानंतर त्याचं कौतुक करताना आयुष्मान पुढे म्हणाला, “मला दिलजीत दोसांझची शैली आवडते. मी पंजाबवर खूश आहे, त्याने स्वतःला आणि त्याच्या हटके स्टाईलला जागतिक स्तरावर आणलं”. अभिनेत्याने त्याचा भाऊ अपारशक्तीच्या फॅशन सेन्सबद्दलही सांगितले. तो म्हणाला की, “मला फॅशनची आवड नाही. मी खूप साधं आयुष्य जगतो, पण जर तुम्हाला तुमच्या कामासाठी वेगळे दिसावे लागत असेल तर तो तुमच्या प्रोफेशनचा भाग आहे. माझा भाऊ अपारशक्तीला फॅशन आवडते. हे काम तो खूप चांगल्या पद्धतीने करतो”.
अभिनेत्याने पुढे सांगितले की, जेव्हा तो सुरुवातीच्या काळात सूत्रसंचालक म्हणून काम करत असे तेव्हा त्याची स्टाइलिंग त्याचा भाऊ अपारशक्ती करत असे. आयुष्मान शेवटचा ‘ड्रीम गर्ल २’ मध्ये दिसला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला. तथापि, अभिनेत्याने अद्याप त्याच्या आगामी कामाबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही.