‘पवईचा फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणून आपले एक बिरुद घेऊन गौरव मोरे या अभिनेत्याने प्रेक्षकॅनचे भरभरून मनोरंजन केले आहे. ‘I am a गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा, टा ना ना ना…’ या त्याच्या खास वाक्याने त्याने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात आपली एक जागा निर्माण केली आहे. छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून गौरवला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या शोमधून त्याने अनेक स्किट्सद्वारे प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले. आपल्या विनोदाच्या अनोख्या शैलीने त्याने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर गौरवने नुकतीच एका हिंदी कॉमेडी शोमध्ये एण्ट्री केली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर गौरव ‘मॅडनेस मचाएंगे’ या कॉमेडी शोद्वारे हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये आधीच हेमांगी कवी व कुशल बद्रिके यांचा सहभाग होता. अशातच यात गौरवचीदेखील भर पडली आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी ही खूपच आनंदाची बाब आहे.
नुकताच या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात ‘मॅडनेस मचाएंगे’च्या भागात अभिनेत्री जुही चावला या पाहुण्यां म्हणून आल्याचे पाहायला मिळत आहे आणि त्यांच्यासमोर गौरव एक विनोदी स्किट सादर करत आहे. आपल्या विनोदी अभिनयाने गौरवने आजवर मराठी प्रेक्षकांना हसवले आहेच, मात्र आता बॉलिवूडच्या अभिनेत्रीलादेखील हसवत असल्याचे पाहून त्याचे चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
या व्हिडीओखाली गौरवच्या अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. तसेच त्याला इतक्या मोठ्या मंचावर बघितल्याचा आनंदही व्यक्त केला आहे. “आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. तुला या ठिकाणी बघून तुझ्या कष्टाला व तुझ्या कलेला सलाम करावासा वाटतो, गौरव तू आता बॉलीवूडचं मार्केट खाणार वाटतं, गौरव तू ज्याप्रकारे जुही मॅमना हसवत आहेस ते पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे, गौरव तुला या मंचावर बघून खूपच भारी वाटत आहे.” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
गौरवच्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. गौरवच्या अनेक चाहत्यांसह अनेक कलाकारांनीदेखील त्याचे कौतुक केले आहे. ऋतुजा बागवे व रितिका श्रोत्री यांनी आपल्या लाडक्या मित्राचे कमेंट्सद्वारे कौतुक केले आहे. दरम्यान, अनेकांनी त्याला हास्यजत्रा शो सोडू नये असा सल्लाही दिला आहे. “गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडू नको, भाई तू ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तच भारी दिसतो” अशाही कमेंट्स केल्या आहेत.