अभिनय क्षेत्रात नशीब आजमावायला आलेल्या अनेक कलाकारांना काही संघर्षांना सामोरे जावे लागते. मराठी मनोरंजनसृष्टी ही मुंबईत आहे. मनोरंजन सृष्टीतील बहुतांश कामे ही मुंबई शहराशी निगडीत आहेत. त्यामुळे अनेक होतकरू कलाकार या क्षेत्रात येण्यासाठी आपले घरदार सोडून येतात आणि हा संघर्ष प्रतीक कलाकाराच्या वाट्याला येतोच. अशा संघर्ष करणाऱ्या होतकरू व नवीन कलाकारांपैकी एक लोकप्रिय कलाकार म्हणजे अभिनेत्री साक्षी गांधी. (Sakshi Gandhi On Instagram)
स्टार प्रवाह वहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे साक्षी गांधी. हे मालिका संपून आता बरेच दिवस पार पडले असले तरी या मालिकेची क्रेझ अजूनही कायम आहे. या मालिकेत साक्षीने अवनी ही नकारात्मक भूमिका साकारली असली तरी तिच्या भूमिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. अशातच तिच्या या अभिनय क्षेत्रातल्या संघर्षावरुन साक्षीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये साक्षीने तिच्या आई-वडिलांविषयी भावुक पोस्ट करत असे म्हटले आहे की, “मुलं मोठी झाली की करिअर करण्यासाठी बाहेर पडतात… आपल्या कुटुंबापासून दूर राहतात… महिनों-महिने एकमेकांची भेट होत नाही किंवा एकमेकांना पाहताही येत नाही.. कॉलवर फक्त आवाज ऐकावं लागतो. चिपळूण सोडून घरच्यांपासून दूर मुंबईत आले त्याला आता ७ वर्षे झाली. खूप मोठं व्हायचं असतं, पैसे कमवायचे असतात, सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. का? तर आयुष्यात स्थिरस्थावर व्हायचं असतं म्हणून. पण आपण आयुष्यात खरचं कधी स्थिरस्थावर होतो का?”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “आपण कामासाठी इतके धावत असतो की, अनेक दिवस घरी दोन मिनिटांचा कॉलसुद्धा करता येत नाही. आई-वडिलांच्या जीवाची घालमेल होत नसेल का? त्यांना रात्र रात्र झोप लागत असेल का? त्यांच्या घशाखाली एखादा चमचमीत पदार्थ उतरत असेल का? हा विचार करुन त्रास होतो. पण सहज उठून जाताही येत नाही आणि तेव्हा खऱ्या अर्थाने घराची ओढ वाटते.”
साक्षीने तिचा आईवडिलांबरोबरचा एक फोटो शेअर करत “आई, पप्पा, क्षितू, तुम्हाला खूप दिवस झाले पाहिलं नाही आहे. पण आपण लवकरच भेटू.” असं म्हटलं आहे. दरम्यान साक्षीच्या या पोस्टखाली रेश्मा शिंदे, विदिशा म्हसकर, अपूर्व रांजणकर, प्राणिता आचरेकरे, त्रिशूल मराठे आदी कलाकारांसह अनेक चाहत्यांनी कमेंट्सद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.