Bigg Boss 17 Latest News : लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रम ‘बिग बॉस १७’ चा महाअंतिम सोहळा काही दिवसांवर आला आहे. हा कार्यक्रम अंतिम फेरीच्या अगदी जवळ आहे. अशातच प्रत्येक स्पर्धकाची हा शो जिंकण्यासाठीची लढाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकीकडे काही लोकांच्या नात्यात बदल होत असताना दुसरीकडे अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यातील भांडण काही संपताना दिसत नाही आहेत. या शोमध्ये आल्यापासून ते आतापर्यंत अंकिता व विकीमध्ये अनेक मतभेद झाले. दरम्यान मागील काही दिवसांमध्ये दोघांमध्ये एवढा दुरावा निर्माण झाला आहे की, दोघांनी मोठा निर्णय घेण्याचे ठरवलं आहे.
‘बिग बॉस १७’च्या मागील भागात अंकिता लोखंडे पती विकी जैनच्या काही कृतींमुळे पुन्हा संतापलेली दिसली. अंकिता तिच्या खोलीत विकीवर रागावून बसली होती. यावेळी विकी तिच्याजवळ जात तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करताना दिसला. पण अंकिता त्याला तेव्हाही चार गोष्टी ऐकवताना दिसली. दरम्यान, अंकिताने विकीला सांगितले की, “मला वाटते की आता आमच्यात काहीच उरले नाही. मला असे वाटते की आमचे नाते आता कमकुवत होत आहे”.
जेवताना विकी अंकिताच्या गोष्टी ऐकत असतो. यावर अंकिता म्हणते, “विकी, आपल्यातील प्रेम कमी होत आहे. बरंच काही झालं आहे त्यामुळे आता त्याची गरज नाही. आता मला वाटत नाही की आपल्याला एकमेकांची गरज आहे किंवा आपलं एकमेकांवर प्रेम आहे”. विकी शांतपणे अंकिताच्या या गोष्टी ऐकत असतो पण बऱ्याच गोष्टी ऐकल्यावर तो चिडतो आणि अंकिताला म्हणतो, “तुला घटस्फोट घ्यायचा आहे का, कृपया हे जाहीर कर. बरं, बाहेर जाऊन काही होणार नाही. तू फक्त बोल. तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुला कधी काय बोलावे तेच कळत नाही”.
हे ऐकून अंकिता म्हणते मी घटस्फोट कधी मागितला. यावर विकी म्हणतो की, “तू एका टास्कमध्ये म्हणाली होतीस की, तू आठवत नसेल तर मी इशाला विचारेन”. हे ऐकून अंकिता म्हणते की, “मी हे गंमतीत बोलले असावे”. यावर विकी म्हणतो की, “तू जे काही बोलतेस ते गमतीत असतं आणि मी जे काही बोलतो ते गंभीर असतं”. याआधीही अंकिता लोखंडेने अनेकदा विकी जैनपासून दूर राहण्याची चर्चा केली होती.