लाखो लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करत लोकांना अध्यात्मिकतेकडे वळवण्याचे काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले आध्यात्मिक गुरु म्हणजे जग्गी वासुदेव. जग्गी वासुदेव यांची केवळ भारतातच नाही तर जगभरात ख्याती आहे. सद्गुरु जग्गी वासुदेव हे योगी, लेखक, कवी व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते आहेत. सद्गुरु जग्गी यांना त्यांच्या शालेय जीवनात एक विचित्र सवय लागली होती. ते मध्यरात्री स्मशानभूमीमध्ये जायचे आणि तासन् तास तिथे बसून मृतदेह दफन करताना पाहत असत. अरुंधती सुब्रमण्यम यांनी ‘युगन युगन योगी: सद्गुरुची महायात्रा’ या चरित्रात याबद्दल उल्लेख केला आहे.
जग्गी वासुदेव यांना शालेय जीवनापासूनच आत्म्यांमध्ये प्रचंड रस होता. त्यामुळे ते कधीकधी त्यांच्या पाळीव कुत्रा रुबीला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने गुपचूप स्मशानभूमीत पोहोचायचे. त्यांना मृत्यूची प्रक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता होती. जळलेले मृतदेह, कवट्या, छिन्नविछिन्न शरीराचे अवयव आणि अंत्यसंस्कारातील भयानक ढिगारा पाहण्यात तो तासन् तास घालवायचे. अरुंधती यांनी असं लिहिलं आहे की, “सद्गुरू अंत्यसंस्काराला शोक करण्यासाठी आलेल्या लोकांच्या जाण्याची वाट पाहत असत आणि शांतपणे मृतदेह जळताना पाहत असत. अंत्यसंस्कार झाल्यावर सर्व लोक गेल्यानंतर ते मृतदेहाचा छिन्नविछिन्न भाग उचलायचे. त्याकडे बारकाईने पाहायचे आणि पुन्हा जळत्या चितेवर टाकायचे.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “सद्गुरु नवव्या इयत्तेत असताना, त्यांच्या सुचरिता नावाच्या एका वर्गमित्राचा न्यूमोनियाने मृत्यू झाला. सुरुवातीला वर्गमित्रांना याची माहिती नव्हती. २० दिवसांनंतर जेव्हा त्यांना सुचरिताचा मृत्यू झाल्याचे कळले, तेव्हा जग्गीला खूपच दु:ख झाले. सुचरिताच्या भावाकडून त्याला कळले की तिच्या शेवटच्या दिवसांत ती अनेकदा ‘जग्गी’ हे नाव घेत असे. यामुळे सद्गुरु अधिक अस्वस्थ झाले. सुचरिताचे नेमके काय झाले? ती कुठे गायब झाली? ती आता कुठे आहे? हे जाणून घेण्यासाठी सद्गुरुंनी एक विचित्र युक्ती शोधून काढली.”
मृत्यूनंतर माणसाचे नेमके काय होते? हे जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वत:च्या मृत्यूचे प्रयत्न केले. यासाठी त्यांनी वडिलांच्या फार्मसीतून गार्डनल-सोडियमच्या ९८ गोळ्या चोरल्या. एका रात्री त्याने अन्न खाल्ले नाही आणि त्याने एकाच वेळी सर्व गोळ्या गिळल्या. यामुळे ते ३ दिवस बेशुद्ध होते आणि अखेर तिसऱ्या दिवशी त्यांना वडिलांच्या रुग्णालयात जाग आली. पण इतके करुनही आपला मृत्यू झालाच नाही याबद्दल त्यांना कायम स्वत:बद्दल राग येत राहिला.