मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय पुरस्कार सोहळा म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट कोण पुरस्कार सोहळा. वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना आणि त्याच्याशी संबंधित विभागांना सन्मानित करणारा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १८ जानेवारी रोजी हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सोहळ्याला अनेक नामांकित कलाकार आपली हजेरी लावून या सोहळ्याची शान वाढवतात.
‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३’ या यंदाच्या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. नुकतेच या पुरस्कार सोहळ्याचे काही प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यापैकी एका प्रोमोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये ‘महाराष्ट्राचा फेवरेट दिग्दर्शक’ हा पुरस्कार रितेश देशमुखला मिळत असल्याची घोषणा करण्यात येते.
यापुढे रितेश हा पुरस्कार स्वीकारायला स्टेजवर जातो आणि त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिला वहिला पुरस्कार त्याच्या पत्नीला समर्पित करतो. यावेळी तो असं म्हणतो की, “जिनिलीया या माझ्या आयुष्यातील पहिली व्यक्ती आहे, जिने मला सांगितलं की मी दिग्दर्शक व्हावं. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून माझा हा पहिला पुरस्कार जिनिलीया तुमच्यासाठी आहे.”
रितेश-जिनिलीया यांच्या या नवीन प्रोमोवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच ‘महाराष्ट्राचा फेवरेट दिग्दर्शक २०२३’ हा पुरस्कार मिळाल्यानिमित्त अनेकांनी रितेश यांचे अभिनंदनही केले आहे. त्याचबरोबर त्यांच्या अनेक चाहत्यांनी रितेशचा काळा सूट व जिनिलीयाची लाल रंगाची नेटची साडी हा खास लूक आवडला असल्याचेही म्हटले आहे.
आणखी वाचा – मन धागा धागा जोडते नवा! पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यांचा साखरपुडा सोहळा संपन्न, कलाकारांची गर्दी अन्…
दरम्यान, यंदाच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३’ या यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेल्या ‘वेड’ या चित्रपटाने तब्बल नऊ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. यासंबंधित हातात पुरस्कार घेतलेले फोटोही रितेश-जिनिलीया यांनी शेअर केले होते. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनीही लाईक्स, कमेंट्सद्वारे शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव केला होता.