टेलिव्हीजनवरील प्रसिद्ध शो ‘शार्क टँक’ची प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक चर्चा रंगते. सध्या ‘शार्क टँक’चा तिसरा सीझन सुरु आहे. या सीझनमधील शार्क्स नवीन स्टार्टअप्सना आकर्षक ऑफर देत आहेत. कधीकधी या शार्क्समध्ये मजेशीर भांडणे पाहायला मिळतात आणि कधीकधी त्यांच्यात मतभेद होतात. अलीकडेच एका पिचरने शार्क्स अमन गुप्ता व रितेश अग्रवाल यांच्यासह चेकवर स्वाक्षरी करुनदेखील डिल केले नाही. या पिचरने एका पॉडकास्टमध्ये याबाबत भाष्य केलं. त्यामुळे सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत. पिचरने ‘शार्क टँक’ शोमध्ये नक्की काय झालं? याचादेखील खुलासा केला आहे. (shark tank fame aman gupta)
दोन आठवड्यांपूर्वी ‘शार्क टँक’मध्ये शाकाहारी फास्ट फूड कंपनी चालवणारे दोन भाऊ आले होते. आपल्या व्यवसायाचे संपूर्ण पीच देऊन भावंडांनी परिक्षकांची मनं जिंकली. या फास्ट फूड चेनचे संपूर्ण भारतामध्ये १५० पेक्षा अधिक आउटलेट आहेत. हा व्यवसाय अजून वाढावा यासाठी कंपनीच्या संस्थापकांनी एक टक्के इक्विटीच्या बदल्यात दीड कोटी रुपयांची मागणी केली. व्यवसाय आकर्षक असल्याने आणि गुंतवणुकीची संधी असल्याने ‘बोट’ कंपनीचे संस्थापक अमन गुप्ता व ‘ओयो’चे मालक रितेश अग्रवाल यांनी गुंतवणूक करण्यास इच्छित असल्याचे सांगितले.
परंतू डिल होत असतानाच सदर भावंडांनी विचारविनिमय करुन परिक्षकांचे काही तासांचे मार्गदर्शन हवे असल्याचेदेखील सांगितले. परंतू रितेश व अमन यांना वेळ देणे शक्य नव्हते. यामुळे भावंडांनी ऑफर नाकारली. नंतर अमन यांनी आपला चेक फाडला व रितेशने माघार घेतली. हा प्रकार सांगताना पिचर म्हणाला, “अमनने चेक फडलला खरा, पण त्याचे नशीबच फाटलेले आहे” असे म्हणाला.
यापुढे पिचर दावा करतो की, “शार्क टॅंक भारत’मध्ये जाणारी आमची पहिली कंपनी असेल जिचा येत्या चार ते सहा महिन्यात आयपीओ लाँच होईल”. आमची कंपनी भारतातील मोठी कंपनी असेल असाही दावा पिचरने केला आहे. पिचरच्या म्हणण्यानुसार, चॅनल फक्त ३० सेकंदाच्या जाहिरातीसाठी ३० लाख रुपये इतकी मोठी रक्कम आकारते. पण या भावंडांचे पीच २० मिनिटे चालले, ज्यामुळे त्यांच्या स्टार्टअपचे सुमारे १२ कोटी रुपयांचे मोफत मार्केटिंग झाले. तसेच लिंक्डइन, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ब्रँडचा प्रचार करून त्यांना ८ कोटी रुपये मिळाले.