लेखन, दिग्दर्शन व अभिनय क्षेत्रात अगदी सहज मुशाफिरी करणारा कलकार म्हणजे संकर्षण. मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत काम करत संकर्षण प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. केवळ अभिनयच नव्हे, तर आपल्या कवितांच्या सादरीकरणातूनही तो प्रेक्षकांची मनं जिंकत आला आहे. तो एक उत्तम लेखक, कवी व संवादकार असल्यामुळे त्याचे लिखाण व बोलणं ऐकणे हेदेखील त्याच्या चाहत्यांना भलतेच आवडत असते.
संकर्षण सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट शेअर करत कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. संकर्षण त्याच्या नाटकानिमित्त होणारे किस्से, आठवणी व काही प्रसंग कायमच सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. अशातच त्याने त्याच्या नाटकाला सैराट फेम अभिनेत्री रिंकु राजगुरु गेल्यानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. संकर्षणने रिंकुबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या पोस्टमध्ये संकर्षणने असं म्हटलं आहे की, “काल (५ एप्रिल) अकलूजचा प्रयोग जोरदार झाला. प्रेक्षकांचा खूप अप्रतिम प्रतिसाद मिळाला. पूर्ण शो हाऊसफुल्ल होता आणि या प्रयोगाच्या प्रेक्षकांमध्ये एक खास पाहुणी होती ती म्हणजे रिंकू राजगुरू. मी अकलूजला येतोय म्हणल्यावर स्वतःहून नाटकाला येते म्हणाली, “माझ्या शहरांत तुझं स्वागत आहे. शहरांत काहीही लागलं तरी हक्काने सांग म्हणाली.” आई-बाबांना घेउन आली. प्रयोग पाहून हसली, रडली आणि कौतुक करुन गेली.”

आणखी वाचा – ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या सेटवर मराठी कलाकारांची इफ्तार पार्टी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “तिचा ‘सैराट’ आला तेंव्हा ‘आम्ही सारे खवय्ये’मध्ये पाहूणी म्हणून आली आणि आमची ओळख झाली. ती आता चांगले चित्रपट करत आहे. तिची लोकप्रियता तर काय विचारायलाच नको. पण तरीही स्वतःहून कळवून, येऊन, भेटून, विचारपुस करुन, कौतुक करुन गेली आणि विशेष म्हणजे “मी पहिल्यांदा स्क्रीनवर दिसले ती तुझ्यासोबत ‘खवय्ये’मध्ये असं पण म्हणाली. छान वाटलं. ह्या सगळ्या तिच्या वागण्या-बोलण्यात शांतता, स्थिरता, समजूतदारपणा आणि प्रवासाची जाणीव होती. वचवच, माज, नखरे काही नाही.”
यापुढे संकर्षणने “ तुला खूप शुभेच्छा. भेटत राहू आणि हो सग्गळ्यात आनंदी चेहरे झाले ते आमच्या बॅकस्टेज कल्लाकारांचे. त्यांच्या मनात एकच भाव होता. “आरची आली आरची“ असंही म्हटलं आहे. दरम्यान, रिंकुनेही “अगदी खुसखुशीत नाटक, खूप मजा आली” असं म्हणत संकर्षणच्या ‘नियम व अटी लागू’ नाटकाचे कौतुक केले आहे.