सध्या रमजाननिमित्त ठिकठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. रमजान पर्वात बहुसंख्य मुस्लीम बांधव उपवास (रोजे) करतात. त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. अशातच मराठी मालिका विश्वातील एका लोकप्रिय मालिकेच्या सेटवरदेखील अशाच एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते आणि ती मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या सेटवर मराठी कलाकारांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असून याचे काही खास क्षण कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेच्या कथानकाने व शीर्षक गीताने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यातच बाप-लेकीच्या नात्याबद्दल आणि आईचा शोध घेण्यासाठी मुलीच्या भाबड्या प्रयत्नांभोवती मालिकेचे कथानक गुंफले आहे. मालिकेतील रोज नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका कायमच चर्चेत राहत असते. अशातच मालिकेच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने या मालिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रमजाननिमित्त सध्या सर्वत्र इफ्तार पाटीचे आयोजन केले जात आहे आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या सेटवरदेखील इफ्तार पार्टीचे खास आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीत मालिकेच्या पड्यावरील कलाकारांसह पडद्यामागील काही कलाकारांनीदेखील सहभाग घेतला होता. मालिकेच्या कलाकारांकडून या पार्टीचे काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
मालिकेतील मल्हार म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकर, अवनी तायवाडे यासंह सर्व कलाकारांनी या पार्टीचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत ज्याप्रमाणे दिवाळी, गणपती, होळी आदी सण साजरे करुन सामाजिक एकता जपली जाते. त्याचप्रमाणे सेटवर इफ्तार पार्टीचे आयोजन करुन मालिकेच्या कलाकारांनी व तंत्रज्ञ मंडळींनी दाखवलेल्या या ‘सर्व-धर्म-समभाव’बद्दल सध्या सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.