Ranapati Shivray Swari Agra : छत्रपती शिवाजी महाराज केवळ पराक्रम, धैर्य आणि नेतृत्वामुळेच नव्हे, तर त्यांच्या तल्लख बुद्धिमत्ता, अचूक रणनीती आणि दूरदृष्टीमुळे इतिहासात अढळ स्थान मिळवून आहेत. असामान्य नियोजन कौशल्याच्या बळावर महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबसारख्या कपटी आणि दगाबाज शत्रूलाही छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले, याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे त्यांची ऐतिहासिक आग्रा स्वारी. ही आग्रा भेट अत्यंत धोकादायक आणि जोखमीची असतानाही महाराजांनी आपल्या कुशल नेतृत्वाने आणि मुत्सद्देगिरीने ती यशस्वी करून दाखवली. हाच शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला, निमित्त होते बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळा.
या ट्रेलर अनावरण कार्यक्रमात शिववंदना आणि शिवशाहिरांनी सादर केलेल्या दमदार पोवाड्यांनी संपूर्ण वातावरण शिवमय करून टाकले. शिवरायांच्या पराक्रमाचा आणि तेजस्वी इतिहासाचा प्रत्यय देणारा हा सोहळा प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. मराठी चित्रपटसृष्टी केवळ कथानकांमध्येच नव्हे, तर मार्केटिंग आणि प्रसिद्धीच्या संकल्पनांमध्येही सातत्याने नवे प्रयोग करत आहे. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासातील सुपरहिरो पात्रांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. AI आधारित चॅटबॉटच्या माध्यमातून शिवकाळातील व्यक्तिमत्त्वे आता थेट प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. (Ranapati Shivray Swari Agra)
या ट्रेलर अनावरण सोहळ्यात शिवाजी महाराजांचा ‘तिसरा डोळा’ म्हणून ओळख असलेल्या बहिर्जी नाईक यांच्या व्यक्तिरेखेच्या AI चॅटबॉटचे अनावरण करण्यात आले. हा चॅटबॉट युजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विविध भाषांमध्ये काही सेकंदांत देतो. मराठी सिनेसृष्टीसह शिवप्रेमींसाठी हा प्रयोग निश्चितच अभिमानास्पद ठरत आहे. औरंगजेबासारखा क्रूर, कपटी बादशहा, कडेकोट पहारा आणि चारही बाजूंनी असलेली निराशा अशा अत्यंत बिकट परिस्थितीत शिवाजी महाराजांची आग्रा स्वारी घडली होती. माणसांची अचूक पारख, राजकीय जाण आणि दूरदृष्टी यांच्या बळावर महाराजांनी ही संकटे कशी हाताळली आणि ही स्वारी कशी यशस्वी केली?, याची प्रभावी झलक या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट येत्या ३० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या प्रसंगी बोलताना दिग्पाल लांजेकर म्हणाले, “शिवरायांच्या नेतृत्वाची, शौर्याची आणि शिस्तबद्ध नियोजनाची महती सांगणारा हा चित्रपट नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. शिवकाळातील एक तेजस्वी पर्व उलगडण्याचा आमचा प्रयत्न आहे.” निर्मात्यांनीही हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात नक्कीच यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. (Ranapati Shivray Swari Agra)
चित्रपटात मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे असून निर्माते म्हणून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सहनिर्माते म्हणून रवींद्र औटी, तान्शा बत्रा आणि आलोक शर्मा सहभागी आहेत. संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिककडे असून, चित्रपटाचे वर्ल्ड वाईड वितरण पॅनोरमा स्टुडिओज करणार आहे. (Ranapati Shivray Swari Agra)





