Bigg Boss Marathi 6 : ‘कलर्स मराठी’वरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. सुरुवातीला मैत्रीत दिसणारे स्पर्धक आता एकमेकांविरोधात उभे राहताना पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून घरात सतत वाद, टोमणे आणि गैरसमज वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आजच्या भागाचा नवा प्रोमो समोर आला असून, त्यामध्ये राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात जोरदार वाद झाल्याचं स्पष्ट होत आहे. या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि चर्चांना उधाण आलं आहे.
प्रोमोमध्ये दिसतं आहे की, राकेश घरातील इतर सदस्यांसमोर आपली नाराजी व्यक्त करत असतो. तो म्हणतो की, “जेव्हा अनुश्री त्याच्याबद्दल बोलत होती, तेव्हा घरातील एकही सदस्य त्याच्या बाजूने उभा राहिला नाही”. तसंच तो अनुश्रीच्या वागणुकीवर आणि घरातील कामांवरूनही नाराजी व्यक्त करतो. राकेशचं हे बोलणं अनुश्रीला खटकतं आणि ती त्याला मध्येच थांबवते. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू होतो. एकमेकांना गप्प बसण्यास सांगत दोघेही चिडलेले दिसतात आणि हा वाद काही वेळातच मोठ्या भांडणात रूपांतरित होतो.
या प्रोमोला ‘कलर्स मराठी’ने सोशल मीडियावर शेअर करत, “राकेश की अनुश्री… या भांडणात कोण मारणार बाजी?” असं कॅप्शन दिलं आहे. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रोमो व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील तुफान आल्या आहेत. काही प्रेक्षकांनी अनुश्रीच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेकांनी राकेशच्या शांत स्वभावाचं समर्थन करत, या भांडणात त्याची बाजू योग्य असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे काही प्रेक्षक अनुश्रीला सपोर्ट करतानाही दिसत आहेत. एकीकडे शांत आणि संयमी असलेला राकेश यावेळी इतका संतापला का? या भांडणाचा पुढील परिणाम घरातील समीकरणांवर कसा होणार? आणि या संघर्षात नेमकं कोणाची बाजू वरचढ ठरणार? हे सगळं पाहणं आता प्रेक्षकांसाठी अधिकच रंजक ठरणार आहे.





