सध्या बऱ्याच कलाकारांनी अभिनयक्षेत्रा बरोबरच व्यवसाय क्षेत्राकडे आपली पावलं वळविली आहेत. काही कलाकारांनी स्वतःचं हॉटेल सुरु केलं आहे, तर काहींनी साड्या, कपड्यांचे स्वतःचे नावाचे ब्रॅण्ड्स सुरु केले आहेत. तर अनेकांनी दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे, प्राजक्ता माळी, अक्षया नाईक, प्रार्थना बेहरे, मीरा जगन्नाथ यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी अभिनयाबरोबरच व्यवसाय क्षेत्रात उडी घेतली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आता आणखी एका अभिनेत्रीने व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. (Rutuja Bagwe on Anaghaa Atul)
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अनघा अतुल. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीने स्वतःच हॉटेल सुरु करणार असल्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली. काल दिनांक १९ ऑक्टोबरला या अभिनेत्रीने तिच्या नव्या हॉटेलचा शुभारंभ केला. अनघाच्या नव्या हॉटेलचं नाव ‘वदनी कवळ’ असून पुण्यातील डेक्कन परिसरात हे हॉटेल तिने सुरु केलं आहे. अनघाच्या या हॉटेलच्या शुभारंभानिमित्त तिच्या कलाकार मित्र मंडळींनी हजेरी लावत या सोहळ्याची रंगत वाढविली. अशातच अनघाची लाडकी मैत्रीण ऋतुजा बागवे ही सोहळयाला पोहोचली होती. ऋतुजाने अनघाच्या हॉटेलची खास झलक तिच्या सोशल मीडियावरून शेअर केली आहे.

अनघाच्या या नव्या व्यवसायासाठी तिला व तिच्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी ऋतुजाने शुभारंभ सोहळ्याला हजेरी लावली होती. ऋतुजाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अनघाच्या हॉटेलमधील फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा देत लिहिलं आहे की, “मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो. पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा! खूप प्रेम, लव्ह यू खूप. अन्नदाता सुखी भव:”. तसेच ऋतुजाने शेअर केलेल्या आणखी एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये स्वतः अनघा पाहुणी म्हणून आलेल्या ऋतुजाला जेवण वाढताना दिसत आहे. अनघा तिला सीताफळ रबडी वाढताना दिसत आहे.

अनघा अतुलने सुरू केलेल्या ‘वदनी कवळ’ हॉटेलमध्ये येणाऱ्या खवय्यांना शुद्ध शाकाहारी पारंपारिक थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. अनघाने तिचा भाऊ अखिलेश भगरेच्या साथीने या नव्या व्यवसायाची सुरूवात केली आहे. अनघाच्या या नव्या हॉटेलच्या शुभारंभानिमित्त तिला शुभेच्छा देण्यासाठी ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कलाकारांनी, तसेच मराठी सिनेसृष्टीतील इतर कलाकारांनीही हजेरी लावली होती.